प्रणाम वीरा – देशसेवेच्या स्वप्नासाठी…

>> रामदास कामत

सीमा भागात अनेक आव्हानात्मक ऑपरेशनचे नेतृत्व करणारे कॅप्टन आर सुब्रमण्यम. कुपवाडा जिह्यातील हाफरुदा जंगलात ऑपरेशन रक्षकदरम्यान अतुलनीय शौर्य आणि उत्कृष्ट लढाऊ नेतृत्व दाखवताना त्यांना वीरगती प्राप्त झाली. धैर्य, अविचल लढाऊ वृत्ती आणि सर्वोच्च बलिदानासाठी त्यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. अशा लढवय्याची ही कहाणी.

एक अतिशय हुशार विद्यार्थी. दहावीत आणि बारावीत 90 टक्क्यांहून अधिक (जवळ जवळ 100 टक्के) गुण मिळवणारा मुलगा. खरे तर डॉक्टर, इंजिनीअर होऊन परदेशी जावे, भरपूर पैसे कमवावेत आणि सुखासीन जीवन जगावे की नाही? पण त्याने देशसेवेचे, लष्करी गणवेशाचे स्वप्न पाहिले. त्याच्या मनात या स्वप्नाशिवाय काहीही नव्हते. ही मुले अशी स्वप्नं जगतात आणि स्वप्नासाठी मृत्यूच्या कुशीत शांतपणे निद्रिस्त होतात. त्यामुळेच हा देश शांत झोपू शकतो आणि सर्व सुखे भोगू शकतो. त्याचं एकच म्हणणे होते, शौर्यासाठी जीवन माणसाला विशेष सन्मान देत असतो. समाधानाचा, कर्तव्यपूर्तीचा सन्मान. जगलो तर पृथ्वी भोगावी आणि मृत्यू आला तर थेट स्वर्गसुख भोगायला निघून जावे, मातृभूमीचे ऋण फेडून. देहावर राष्ट्रध्वज पांघरलेला असावा, आसमंतात जयजयकार निनादात राहावा.

ही प्रेरणादायी कहाणी आहे कॅप्टन आर सुब्रमण्यम यांची. त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1976 रोजी मुंबईतील गोरेगाव येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण गोरेगाव येथील विवेक विद्यालयातून आणि महाविद्यालयीन एचएससीपर्यंतचे शिक्षण एमव्हीएलयू कॉलेजमधून पूर्ण केले. कॅप्टन सुब्रमण्यम हे शालेय जीवनात अतिशय हुशार विद्यार्थी होते. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळवून सुखासीन जीवन जगता आले असते, पण त्यांनी मार्ग निवडला देशसेवेचा, एक जिद्द, ध्येय आणि हिंमत उराशी बाळगून आणि त्या ध्येयाप्रति वाटचाल सुरू केली. राष्ट्रीय संरक्षण अकादमीतून 1996 मध्ये पदवी प्राप्त केल्यावर 1997 मध्ये आयएमए, डेहराडून येथे प्रशिक्षण पूर्ण केले. त्याच वर्षी 7 जून रोजी त्यांना सेकंड लेफ्टनंट म्हणून प्रथम पॅरामध्ये कमिशन मिळाले. त्यानंतर त्यांना जोरहाट (आसाम) येथे आणि कठोर प्रशिक्षणानंतर क्रमांक 1 पॅराशूट रेजिमेंट (स्पेशल फोर्सेस) युनिटमध्ये सामील करण्यात आले. त्यांचे पुढील प्रशिक्षण लष्करी युद्ध मुख्यालय इंदूर येथे आणि बेळगाव येथील तोफखान्यात झाले. त्यांना मे 1999 मध्ये कारगिल सेक्टरमध्ये मुश्कोह व्हॅलीच्या द्रास सेक्टरमध्ये तैनात करण्यात आले. तिथे त्यांनी अनेक आव्हानात्मक ऑपरेशन्सचे नेतृत्व केले. नंतर त्यांना हिमाचल प्रदेशातील नाहान येथे पोस्टिंग देण्यात आले. त्यानंतर 2000 मध्ये त्यांना ऑपरेशन रक्षकसाठी श्रीनगरला पाठवण्यात आले. 2000 मध्ये त्यांच्या कर्तव्य दक्षतेमुळे कॅप्टनपदी पदोन्नती मिळाली. आता खांद्यावरच्या वाढलेल्या स्टार्ससोबतच जबाबदारीसुद्धा वाढली होती. कॅप्टन सुब्रमण्यम आता नव्या उमेदीने देशसेवेसाठी सज्ज झाले.

18 जून 2000 रोजी कॅप्टन सुब्रमण्यम कुपवाडा जिह्यातील हाफरुदा जंगलात एका कारवाईचे नेतृत्व करत होते. संध्याकाळी उशिरा त्यांच्या सैन्यावर एका अतिरेकी गटाकडून जोरदार गोळीबार सुरू झाला. कॅप्टन सुब्रमण्यम यांनी तातडीने परिस्थितीचा ताबा घेत सैन्याचे नेतृत्व केले आणि अतिरेक्यांशी झुंज दिली. सुमारे नऊ अतिरेकी भारतीय सीमेत घुसल्याची बातमी होती. हवामानाचा, रात्रीच्या भयावह अंधाराचा अजिबात बाऊ न करून घेता ते आणि त्यांचे सहकारी अतिरेक्यांच्या शोधात निघाले. आपल्या सैनिकांची चाहूल लागताच पाकिस्तानी अतिरेकी सावध झाले आणि पुढे रात्रभर घमासान लढाई सुरू राहिली. पहाटेपर्यंत काही अतिरेक्यांचे मुडदे पडले. विरुद्ध बाजूने येणारा गोळीबार थांबला. त्यामुळे एकतर सर्वच मारले गेले असतील किंवा वाचलेले परत मागे पळून गेले असतील असा अंदाज लावून आपल्या सैनिकांनी काही वेळ विश्रांती घेतली. दुसऱया दिवशी सकाळी 19 जून 2000 ला सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास त्या अतिरेक्यांचे मृतदेह आणि त्यांच्या जवळ आलेल्या इतर वस्तू ताब्यात घेण्यासाठी कॅप्टन सुब्रमण्यम सैनिकांची एक तुकडी घेऊन युद्धस्थळी गेले. सहा अतिरेक्यांचा खातमा झाला होता, पण दुर्दैवाने तीन अतिरेकी बचावले होते. शत्रूचे मृतदेह काढत असताना तीन अतिरेक्यांनी त्यांच्या सैन्यावर गोळीबार सुरू केला. तीन एके 47 एकाच वेळी एकाच दिशेला फायर करीत होत्या. कॅप्टन सुब्रमण्यम फायर करीत वायुवेगाने पुढे निघाले. दोघांना अचूक टिपले. तिसरा जो झाडाखाली विसावला होता तो अचानक उठला आणि त्याने कॅप्टनवर गोळ्यांचा वर्षाव केला, पण तशा परिस्थितीतही कॅप्टनने त्यालाही यमसदनी धाडले. कॅप्टन सुब्रमण्यम यांच्या चेहऱयावर, डोक्यात कित्येक गोळ्या शिरल्या. त्यांना त्वरित विमानाने बेस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण तोपर्यंत हा कर्तव्यतत्पर आणि जोशीला देह शांत झाला होता.

कॅप्टन सुब्रमण्यम यांनी ऑपरेशन रक्षकदरम्यान अतुलनीय शौर्य आणि उत्कृष्ट लढाऊ नेतृत्व दाखवले. त्यांच्या अपवादात्मक धैर्य, अविचल लढाऊ वृत्ती आणि सर्वोच्च बलिदानासाठी 26 जानेवारी 2001 रोजी मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. 12 ऑक्टोबर 2001 रोजी त्यांच्या आई श्रीमती सुब्बलक्ष्मी यांनी राष्ट्रपतींकडून ते स्वीकारले. देशसेवा हेच ध्येय आणि स्वप्न पाहणाऱया या अविचल वीराला सलाम!
[email protected]

Comments are closed.