Mumbai News – मुंबई विमानतळावर परदेशी सोने तस्करीचा पर्दाफाश, दोन सफाई कर्मचाऱ्यांना अटक

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी डीआरआयने विमानतळावरील दोन सफाई कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. आरोपींकडून 24 कॅरेटचे 1.2 किलो परदेशी सोने जप्त केले आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध सीमाशुल्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू करण्यात आला आहे. डीआरआय आता या नेटवर्कमध्ये आणखी किती लोक सहभागी आहेत आणि कोणाच्या सूचनेनुसार तस्करी करत होते याचा तपास करत आहे.
गुप्त माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) शनिवारी पाळत ठेवली होती. यादरम्यान डीआरआय टीमला एरोब्रिजच्या पायऱ्यांवर सफाई कर्मचाऱ्यांचा एक टीम लीडर संशयास्पदरित्या एक पॅकेट लपवण्याचा प्रयत्न करताना दिसला. अधिकाऱ्यांनी त्याला थांबवले असता तो कर्मचारी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला.
अधिकाऱ्यांनी त्याला पकडले आणि त्याच्याकडील पॅकेट जप्त केले. जप्त केलेल्या पॅकेटमध्ये पांढऱ्या कापडात सोन्याची पावडर आणि मेण आढळले. कर्मचाऱ्याची चौकशी केली असता त्याच्या पर्यवेक्षकाने सोन्याचे पॅकेट काढून त्याच्याकडे बाहेर देण्यासाठी सोपवले असल्याचे त्याने सांगितले. यानंतर डीआरआयने पर्यवेक्षकालाही अटक केली आहे. दोघेही विमानतळावरून सोने बाहेर नेण्यासाठी तस्करांना मदत करत होते. दोन्ही आरोपी एका खाजगी विमानतळ सेवा कंपनीत काम करतात.
Comments are closed.