भारतातील वनक्षेत्र वाढले आहे

वृक्ष आच्छादनातही पडली भर : भारतासाठी मोठी गूड न्यूज

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतात दोन वर्षांदरम्यान वृक्ष आच्छादन आणि वन आच्छादनात वाढ झाली आहे. परंतु वृक्ष आच्छादनाच्या तुलनेत वन आच्छादनात किरकोळच वाढ झाली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्टर रिपोर्ट (आयएसएफआर) 2023 जारी केला असून यात हा दावा करण्यात आला आहे. आयएसएफआरनुसार देशाचे वन अन् वृक्ष आच्छादन वाढून 25.17 टक्के झाले आहे. 2021 मध्ये हे प्रमाण 24.62 टक्के होते. वाढते वन अन् वृक्ष आच्छादन हे भारतासाठी चांगले वृत्त आहे. भारत सरकारने मागील काही काळात वन आच्छादन वाढण्यासाठी प्रभावी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

आता देशात एकूण वन आच्छादन 7 लाख 15 हजार 342.61 चौरस किलोमीटर झाले आहे. हे देशाच्या भौगोलिक क्षेत्रफळाच्या 21.76 टक्के आहे. तर वृक्ष आच्छादन देखील देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या 3.41 टक्के आहे. आता देशाचे एकूण वन अन् वृक्ष आच्छादन 8 लाख 27 हजार 356.95 चौरस किलोमीटर आहे. या अहवालात पहिल्यांदाच अँग्रोफॉरेस्ट लँडच्या मोठ्या वृक्षांनाही सामील करण्यात आले आहे.

फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाच्या आयएसएफआर 2023 अहवाल जारी होण्यास सुमारे एक वर्षाचा विलंब झाला आहे. हा अहवाल मागील वर्षी जारी होणे अपेक्षित होते. या अहवालातून वाढता स्टॉक, वनक्षेत्राबाहेरील वृक्ष, खारफुटीचे आच्छदान, बांबू आणि फॉरेस्ट कार्बन स्टॉकचे असेसमेंट समोर येते.

5 राज्यांमध्ये वाढले वृक्ष आच्छादन

एकीकडे पाच राज्यांमध्ये वन अन् वृक्ष आच्छादन वाढले आहे. तर पाच राज्यांमध्ये हे कमी झाले आहे. छत्तीसगड, उत्तरप्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि झारखंडमध्ये हे वाढले आहे. तर मध्यप्रदेश, कर्नाटक, नागालँड, बिहार आणि त्रिपुरात हे कमी झाले आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानुसार छत्तीसगडमध्ये वन अन् वृक्ष आच्छादन सर्वाधिक वाढले आहे. छत्तीसगडमध्ये हे 684 चौरस किलोमीटर, उत्तरप्रदेशात 559 चौरस किलोमीटर, ओडिशात 559 चौरस किलोमीटर आणि राजस्थानात 395 चौरस किलोमीटरने वाढले आहे.

सर्वाधिक वन आच्छादन मध्यप्रदेशात

तर वन आच्छादन सर्वाधिक मिझोरममध्ये 242 चौरस किलोमीटर, गुजरातमध्ये 180 चौरस किलोमीटर, ओडिशात 152 चौरस किलोमीटरने वाढले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीकोनातून सर्वाधिक वन अन् वृक्ष आच्छादन मध्यप्रदेशात आहे. मध्यप्रदेशात 85,724 चौरस किलोमीटर, अरुणाचल प्रदेशात 67,083 चौरस किलोमीटर आणि महाराष्ट्राकडे 65,383 चौरस किलोमीटर वन आच्छादन आहे.

वणव्यांबद्दलही डाटा

या अहवालात  जंगलांमध्ये आग लागण्याच्या घटनांनाही स्पर्श करण्यात आला आहे.  अहवालानुसार उत्तराखंडच्या जंगलांमध्ये सर्वाधिक 21,033 वणव्याच्या घटना घडल्या आहेत. यानंतर ओडिशात 20,973 आणि छत्तीसगडमध्ये 18,950 वणव्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. महाराष्ट्राच्या गडचिरोलीत 7042, आंध्रदेशच्या अल्लूरी सीतारमा राजा येथे 6399 आणि छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये 5018 आगीच्या घटना घडल्या आहेत.

Comments are closed.