Sangameshwar News – अवैध लाकूड साठ्यावर वनविभागाची कारवाई, पाच ट्रक जळाऊ लाकूड जप्त

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

संगमेश्वर तालुक्यात बेसुमार विना परवाना जंगलतोड सुरु असल्याचा स्पष्ट पुरावा बुरंबी ते कोसुम्ब रेवाळेवाडी रस्त्यावर पर्यावरण प्रेमी मंडळीना दिसून आला होता. याबाबत त्यांनी थेट वनविभाग आणि वृत्तपत्रांकडे याबाबतचे पुरावे सादर केले होते. याची दखल घेऊन देवरुखचे वनपाल सागर गोसावी यांनी सदरचा बेकायदेशीर आणि विनापरवाना रस्त्या कडेला असलेला लाकूड साठा जप्त करुन कारवाई केली असल्याची माहिती परीक्षेत्र वना धिकारी सुतार यांनी पत्रकारांना दिली.

सदर बेकायदेशीर लाकूड साठा कानाल नामक व्यक्तीचा असून तो एकूण पाच ट्रक एवढा होता. सध्याच्या दराने त्याचे बाजार मूल्य एक लाख ९६ हजार एवढे होत असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले. अशा प्रकारचे जळाऊ लाकडाचे साठे नायरीच्या खोऱ्यासह, धामणी, कुचांबे, धामापूर आदि भागात असल्याचे पुरावे छायाचित्र आणि चित्रफितीसह वनविभागाकडे सादर केले जाणार आहेत. याबरोबरच वन विभागाने देखील असे बेकायदेशीर लाकूड साठे ताब्यात घेण्यासाठी आपली गस्त वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे. गावागावात जर अशा प्रकारचे बेकायदेशीर जळाऊ लाकडाचे साठे आढळून आले आणि पर्यावरण प्रेमी तसेच ग्रामस्थाची तक्रार आल्यास वनविभाग नक्कीच कठोर कारवाई करेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

एकाच ठिकाणी जर पाच ट्रक जळाऊ लाकडाचा बेकायदेशीर साठा जप्त केला जात असेल तर, आडमार्गावर असे आणखी साठे असू शकतील, त्यामुळे वन विभागाने आपली गस्त वाढवावी आणि या बेकायदेशीर जंगलतोडीला आळा घालावा, अशी मागणी पर्यावरण प्रेमीनी केली आहे.

Comments are closed.