5 ओव्हर्स विसरा! सेमीफायनल-फायनलच्या निकालासाठी आता ‘इतक्या’ ओव्हर्सचा खेळ हवाच; जाणून घ्या नियम

T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये आज बुधवारी इडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड (South Africa vs New Zealand) यांच्यातील लढतीसोबतच हा मेगा इव्हेंट आता आपल्या सर्वात मोठ्या बाद फेरीच्या (नॉकआउट) सामन्यांसाठी सज्ज झाला आहे. आधी दोन सेमीफायनल आणि त्यानंतर विजेतेपदासाठी फायनलची झुंज रंगणार आहे. दरम्यान, शेवटच्या तीन सामन्यांसाठी ग्रुप स्टेज आणि सुपर-8 फेरीच्या तुलनेत काही नियम बदलणार आहेत. जरी हे बदललेले नियम संख्येने कमी असले तरी, सामन्याच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. वर्ल्ड कपचे शेवटचे 3 मेगा सामने नियमांच्या बाबतीत आतापर्यंतच्या सामन्यांपेक्षा किती वेगळे आहेत, हे सविस्तर जाणून घ्या.
ग्रुप स्टेज आणि सुपर-8 राउंडमध्ये सामन्याचा निकाल लावण्यासाठी दोन्ही संघां दरम्यान किमान ५ ओव्हर्सचा खेळ होणे अनिवार्य होते. मात्र, शेवटच्या तीन सामन्यांत किंवा सर्वात मोठ्या नॉकआउट सामन्यांमध्ये ‘खेळाचा निष्पक्षपणा’ (Fairness) सुनिश्चित करण्यासाठी ही मर्यादा वाढवण्यात आली आहे. शेवटच्या तीन मेगा सामन्यांमध्ये निकाल मिळवण्यासाठी दोन्ही संघांना किमान १० ओव्हर्स (जोपर्यंत एखादा संघ ऑलआउट होत नाही) खेळाव्या लागतील. जर एखादा संघ १० ओव्हर्स पूर्ण करू शकला नाही, तर सामना रिझर्व्ह-डे (राखीव दिवस) कडे जाईल.
सामन्याच्या मूळ दिवशी खेळ पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्धारित वेळेनंतर अतिरिक्त ९० ते १२० मिनिटांचा वेळ मिळेल. त्याचबरोबर, प्रत्येक सेमीफायनल आणि फायनलसाठी एक स्वतंत्र रिझर्व्ह-डे निश्चित करण्यात आला आहे. सामना सुरू ठेवण्याचा नियम असा आहे की: रिझर्व्ह-डे वर सामन्याची नव्याने सुरुवात होणार नाही. खेळ नेमका तिथूनच पुन्हा सुरू केला जाईल जिथे मूळ दिवशी तो थांबवण्यात आला होता (तोच स्कोअर, तोच चेंडू आणि तेच विकेट्स).
सुपर-8 राउंडमध्ये पाऊस पडल्यास सामना त्याच दिवशी रद्द केला जात असे, परंतु शेवटच्या तीन मेगा नॉकआउट सामन्यांमध्ये असे होणार नाही. सेमीफायनल आणि फायनलमध्ये हे ‘रोलिंग शेड्यूलिंग’ नुसार लागू होईल. म्हणजेच, जर पहिल्या दिवशी उदाहरणार्थ पावसामुळे सामना ६.१ ओव्हरवर थांबला, तर रिझर्व्ह-डे वर सामना ६.२ ओव्हरपासून सुरू होईल. जो फलंदाज पहिल्या दिवशी स्ट्राईकवर होता तोच खेळेल आणि जो गोलंदाज बॉलिंग करत होता तोच गोलंदाजी करेल.
जर एखादा सामना रिझर्व्ह-डे वर गेला, तर तो सहसा लवकर सुरू केला जातो (उदा. रात्री ७:०० ऐवजी दुपारी ३:०० वाजता), जेणेकरून दिवसाचा जास्तीत जास्त उजेड आणि अतिरिक्त १२० मिनिटांच्या बफर वेळेचा पूर्ण वापर करता येईल.
नॉकआउट सामने असल्याने ही लढत ‘आर-पार’ची असेल. अशा स्थितीत सुपर-ओव्हर होणार नाही, असा विचारही करता येणार नाही. कोणत्या सामन्यात कधी सुपर-ओव्हरची गरज पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे शेवटच्या तिन्ही नॉकआउट सामन्यांमध्ये सुपर-ओव्हरचा नियम लागू राहील.
ग्रुप स्टेज आणि सुपर-8 राउंडप्रमाणेच दोन्ही संघांना प्रत्येक डावात २ रिव्ह्यू (DRS) मिळतील. यामध्ये एलबीडब्ल्यू, कॅच, बॅटची कड लागली आहे का हे तपासणे आणि बॉल ट्रॅकिंग इत्यादींचा समावेश असेल.
Comments are closed.