रोहित-सचिन-सेहवाग बाजूला, विराटने आयपीएलपूर्वी सांगितला बेस्ट टी20 ओपनर

आयपीएल २०२६ च्या सुरुवातीला आता केवळ काही दिवस शिल्लक राहिले आहेत. आगामी हंगामापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने विराट कोहलीला एक मजेशीर प्रश्न विचारला, ज्याचे त्याने अतिशय चपखल उत्तर दिले आहे. ‘किंग’ कोहलीला प्रश्न विचारण्यात आला होता की, “टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीवीर कोण आहे?” यावेळी त्याच्यासमोर काही पर्यायी नावेही ठेवण्यात आली होती. यामध्ये ॲडम गिलख्रिस्ट, सुनील नरेन, ट्रेविस हेड, वीरेंद्र सेहवाग, क्विंटन डी कॉक, शेन वॉटसन, शिखर धवन, फाफ डु प्लेसिस, ब्रेंडन मॅक्युलम, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि ख्रिस गेल यांचा समावेश होता. यातून विराटने ख्रिस गेलची टी-२० चा सर्वोत्तम सलामीवीर म्हणून निवड केली.
विराट कोहलीची ही निवड चुकीची वाटत नाही, कारण टी-२० क्रिकेटमध्ये गेलला तोड नाही. त्याच्या उत्कृष्ट खेळाचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज आहे. क्रिकेटच्या या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये त्याने २००५ ते २०२२ दरम्यान एकूण ४६३ सामने खेळले. यादरम्यान ४५५ डावांमध्ये ३६.२२ च्या सरासरीने १४,५६२ धावा करण्यात तो यशस्वी ठरला. या काळात क्रिकेट चाहत्यांना त्याच्या बॅटमधून २२ शतके आणि ८८ अर्धशतके पाहायला मिळाली. नाबाद १७५ धावांची खेळी ही त्याची एका सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या ठरली.
ख्रिस गेल हा संपूर्ण जगात टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा पहिला फलंदाज आहे. गेलने ४६३ सामन्यांच्या ४५५ डावांमध्ये तब्बल १०५६ षटकार लगावले आहेत. याशिवाय त्याच्या बॅटमधून ११३२ चौकार निघाले आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये गेलचा स्ट्राईक रेट १४४.७५ राहिला आहे.
Comments are closed.