बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन

बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान व बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या अध्यक्षा खालिदा झिया यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या. ढाक्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नियमित तपासणीसाठी मागील महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या छातीत संसर्ग असल्याचे निदान झाले. त्यामुळे त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. मात्र, उत्तरोत्तर त्यांची प्रकृती खालावत गेली. आज अखेर त्यांचे निधन झाले. झिया यांचे ज्येष्ठ पुत्र तारिक रेहमान यांनी ही माहिती दिली.

कालच भरला होता निवडणुकीसाठी अर्ज

बांगलादेशात फेब्रुवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणूक होत आहे. व्हेंटिलेटरवर असतानाही खालिदा झिया यांना निवडणुकीत उतरवण्याची तयारी त्यांच्या पक्षाने केली होती. बोगुरा-7 या परंपरागत मतदारसंघातून सोमवारी त्यांचा अर्जही दाखल करण्यात आला होता. हा अर्ज आता मागे घ्यावा लागणार आहे.

Comments are closed.