भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांना अटक; चार दिवसांची कोठडी, एक कोटीची फसवणूक
भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक तोंडावर आली असतानाच माजी महापौर विलास पाटील यांना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. एक कोटीच्या आर्थिक फसवणुकीप्रकरणी ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई केली असून शनिवारी सुट्टीकालीन न्यायालयाने पाटील यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र ही अटक राजकीय दबावातून केल्याचा आरोप कोणार्क विकास आघाडीने केला आहे.
महापालिका निवडणुकीनंतर विलास पाटील व भाजप आमदार महेश चौगुले यांच्या गटात १८ जानेवारी रोजी तुफान राडा झाला होता. या घटनेनंतर विलास पाटील फरार होते. त्यांना ७ फेब्रुवारी रोजी अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. दरम्यान, महापौरपदाच्या निवडणुकीसाठी विलास पाटील हे आकड्यांची जुळवाजुळव करत होते. यासाठी त्यांनी शिंदे गटासोबत जवळीक वाढवली होती. १६ फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी निवडणूक होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली होती. अशातच शुक्रवारी रात्री विलास पाटील यांना एक कोटीच्या आर्थिक फसवणूकप्रकरणी अटक करण्यात आली.
कारवाईनंतर दुकाने बंद केली
भिवंडी महापौरपदाच्या निवडणुकीत किंगमेकरची भूमिका वटवण्याच्या तयारीत असलेल्या विलास पाटील यांना अटक झाल्याने शिंदे गटाचे मनसुबे उधळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अटकेच्या कारवाईनंतर भादवड, टेमघर, नवी वस्ती या परिसरात नगरसेवक बाळाराम चौधरी, रोहित चौधरी व दिन मोहम्मद यांनी रस्त्यावर उतरत दुकाने बंद करण्यास सुरुवात केली. जोरजबरदस्तीने ही दादागिरी सुरू होती असा आरोप काही व्यापाऱ्यांनी केला.
Comments are closed.