टी20 वर्ल्डकपमधून बाहेर होताच ‘या’ संघाच्या खेळाडूने जाहीर केली निवृत्ती, कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना…

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये २० संघ खेळले. इतिहासात पहिल्यांदाच या स्पर्धेत एवढे संघ खेळले. यामधील आठ संघांनी सुपर-८मध्ये प्रवेश केला आहे. त्यामध्ये दक्षिण आफ्रिका, भारत, श्रीलंका, वेस्ट इंडिज, इंग्लंड, झिम्बाब्वे, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. सुपर-८चे सामने २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. अशातच एका भारतीय वंशांच्या माजी कर्णधाराने निवृत्ती जाहीर केली आहे.

कॅनडाचा माजी कर्णधार नवनीत धालिवालने (Navneet Dhaliwal) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो आज (१९ फेब्रुवारी) त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. हा सामना अफगाणिस्तानविरुद्ध असून चेन्नईमध्ये खेळला जाणार आहे. त्याने या विश्वचषकाआधीच निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता.

नवनीतने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत टी२० विश्वचषक २०२४साठी पात्र झाल्यावर सुरूवातीच्या सामन्यांमध्ये धावा केल्याच्या आणि कॅनडाचे नेतृत्व करतानाचा प्रवास कसा होता, याच्या आठवणी आयसीसीच्या मुलाखतीत सांगितल्या. निवृत्तीनंतर तो प्रशिक्षणाकडे वळणार आणि युवा खेळाडूंना त्यांचे भविष्य सुधारण्यात मदत करणार, असे विधान केले आहे.

कॅनडामध्ये क्रिकेटचा प्रसार जलदरित्या होता आहे. याबद्दल नवनीत म्हणाला, “न्यूझीलंडविरुद्ध सारख्या संघाविरुद्ध विश्वचषकात शतक करणे उल्लेखनीय आहे. यावरून कॅनडामध्ये क्रिकेट जलदरित्या पुढे जात आहे, असे दिसून येते.” कॅनडाचा फलंदाज युवराज समराने हे शतक केले होते.

झिम्बाब्वे दौऱ्यात कॅनडा ए संघाकडून उत्तम कामगिरी करत नवनीतने २०१५मध्ये वरिष्ठ संघासाठी नामिबियामध्ये झालेल्या वर्ल्ड क्रिकेट लीग २मधून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने आतापर्यंत १७ वनडे आणि ४८ टी२० सामने खेळले आहेत. टी२०मध्ये त्याने १३०५ धावा केल्या असून त्यात १० अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची या प्रकारातील सर्वोच्च खेळी नाबाद ७० राहिली.

नवनीतने २०२४च्या टी२० विश्वचषकात यूएसएविरुद्ध ६१ धावा केल्या होत्या. ते कॅनडाकडून टी२० विश्वचषकातील पहिलेच अर्धशतक ठरले होते. तो कॅनडाकडून टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने २९ टी२० सामन्यांमध्ये कॅनडाचे नेतृत्व करताना संघाने २१ सामने जिंकले.

या स्पर्धेत कॅनडा ग्रुप डी मध्ये होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात नवनीतने ६५ धावांची खेळी केली होती. त्या सामन्यात २१४ धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कॅनडाने तो सामना ५७ धावांनी गमावला. तसेच त्यांनी साखळी फेरीतील खेळलेले आणखी दोन्ही सामने गमावले आहेत.

Comments are closed.