माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांचा द्रमुकमध्ये प्रवेश
अण्णाद्रमुकमधून झाली होती हकालपट्टी : मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून सदस्यत्व प्रदान
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा बदल दिसून आला आहे. माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकचे माजी नेते ओ. पन्नीरसेल्वम यांनी शुक्रवारी द्रमुकमध्ये प्रवेश केला आहे. द्रमुक अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पक्षांतराचे पाऊल उचलले आहे.
पन्नीरसेल्वम हे तीनवेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. जयललितांचे अत्यंत निकटवर्तीय सहकारी मानले जाणाऱ्या पन्नीरसेल्वम यांच्यावरून अण्णाद्रमुकमध्ये मतभेद सुरू होते. अण्णाद्रमुकचे अनेक नेते पन्नीरसेल्वम यांच्या विरोधात होते. यामुळे 2022 मध्ये पक्षाने त्यांची हकालपट्टी केली होती.
द्रमुकचे मानले आभार
पक्षात सामील केल्याप्रकरणी द्रमुक नेत्याचे आभार मानतो. स्टॅलिन हे अत्यंत चांगल्याप्रकारे पक्ष चालवत आहेत. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी तामिळनाडूला सुशासन दिले आहे. खासकरून महिला द्रमुक सरकारच्या योजनांमुळे आनंदी आहेत. तर दुसरीकडे ई. पलानिस्वामी हे हुकुमशाहीच्या पद्धतीने पक्ष चालवत असून अण्णाद्रमुकचे पतन निश्चित असल्याचे वक्तव्य पन्नीरसेल्वम यांनी केले आहे. स्टॅलिन यांनी ओपीएस यांचे पक्षात स्वागत केले आहे. पन्नीरसेल्वम यांच्यासोबतचे छायाचित्र शेअर करत स्टॅलिन यांनी द्रविड आंदोलनाच्या विचारसरणीच्या रक्षणासाठी पन्नीरसेल्वम आमच्या महान पक्षात सामील झाल्याचा दावा केला आहे.
राजकीय समीकरण बदलणार
पन्नीरसेल्वम यांच्या द्रमुक प्रवेशामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात आणि आगामी निवडणुकीवर याचा प्रभाव पडू शकतो. पन्नीरसेल्वम यांच्या द्रमुक प्रवेशामुळे राज्यातील दोन मोठ्या पक्षांमधील प्रतिस्पर्धेला नवे रुप मिळू शकते. पन्नीरसेल्वम यांना आगामी निवडणुकीत द्रमुककडून मेट्टू या मतदारसंघाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
Comments are closed.