‘त्यांना घाबरवू नका’ रो-को बद्दल माजी निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया! जाणून घ्या नेमकं काय म्हणाले

टीम इंडियाचे सुपरस्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली (Rohit Sharma & Virat Kohli) यांनी अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विराटने शेवटच्या सामन्यात धावा केल्या, तर रोहितने एका सामन्यात शतक आणि एका सामन्यात अर्धशतक झळकावलं. तरीदेखील त्यांच्या वयाचा मुद्दा काढत काही लोक त्यांना संघातून बाहेर करण्याची मागणी करत आहेत.

पण आता ‘हिटमॅन’ आणि ‘किंग कोहली’ या दोघांना भारतीय संघाचे माजी मुख्य निवडकर्ते कृष्णमाचारी श्रीकांत (Krushnamachari Shrikant) यांचा पाठींबा मिळाला आहे. त्यांनी बीसीसीआयला थेट संदेश दिला आहे.

रोहित सध्या 38 वर्षांचा आहे, तर विराट 36 वर्षांचा. त्यामुळे दोघांची टीममधील जागा टिकणार का, याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, सिडनीत झालेल्या सामन्यात दोघांनी अप्रतिम कामगिरी करून सर्वांना उत्तर दिलं. तरीदेखील वयाचा हवाला देत त्यांच्या निवृत्तीबद्दल चर्चा सुरूच आहे.

यावर बोलताना श्रीकांत यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर म्हटलं,
रोहित आणि विराट 2027 साठी पूर्ण तयार आहेत. माझ्या मते रोहितने नक्कीच 2027 चा वर्ल्ड कप खेळायला हवा. वयाचं कारण देऊ नका. ‘तो 40 वर्षांचा होतोय’ असं बोलणं बंद करा. तो फिट आहे, चांगला खेळतोय, स्लिपमध्ये झपाट्याने कॅच घेतोय. अजून काय हवं? तो प्रत्येक सामन्यात धावा करतोय. सिडनीत तर त्याने फार सहजतेने फलंदाजी केली, अगदी 2019 वर्ल्ड कपमधल्या त्याच्या खेळाची आठवण झाली. हो, तो पूर्ण वेगाने खेळला नाही, पण त्याचा आत्मविश्वास आणि नियंत्रण दिसत होतं.

श्रीकांत पुढे म्हणाले, रोहित-विराटला घाबरवू नका. त्यांच्यात भीती निर्माण करू नका. त्यांना शांततेत खेळू द्या. त्यांना सांगा की ते टीमसाठी किती महत्त्वाचे आहेत. त्यांना फक्त फिट राहायला सांगा आणि त्यांच्याभोवती टीम तयार करा. हे दोघेही भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते दोघे फिट राहिले तर टीम इंडियासाठी आणि त्यांच्यासाठी दोघांसाठीही फायदेशीर ठरेल. जर मी आज निवड समितीचा अध्यक्ष असतो, तर मी त्यांच्याकडे जाऊन असं सांगितलं असतं, ‘2027 वर्ल्ड कपसाठी स्वतःला फिट ठेवा आणि भारताला ट्रॉफी जिंकवून द्या.

Comments are closed.