Former corporator Godse’s house burglarized; thief arrested
शिवसेना माजी नगरसेवक सुनील गोडसे यांच्या घरात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला उपनगर पोलीस ठाणे व गुन्हे शाखा युनिट दोन यांच्या संयुक्त कारवाईत अटक केली. अटक केलेल्या आरोपीकडून आठ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Former corporator Godse’s house burglarized; thief arrested)
लखनसिंग दुधानी (वय ३६, रा. रामटेकडी, हडपसर, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. १८ फेब्रुवारी रोजी दुपारी गोडसे हे त्यांच्या घराच्या दरवाजाला कुलूप लावून बाहेर गेले. त्यावेळी चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलीस उपआयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, संदीप मिटके यांनी सतत तपासावर लक्ष ठेवले.
गुन्हे शाखा युनिट-दोन आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने सुमारे ५० सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे लखनसिंग दुधानी आणि त्याच्या साथीदाराची माहिती मिळवली. सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक समाधान हिरे आणि त्यांच्या पथकाने पुण्यातून आरोपीस ताब्यात घेतले व उपनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.
आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने रविसिंग कल्याणी (रा. रामटेकडी, हडपसर, पुणे) याच्या मदतीने चोरी केल्याचे उघड झाले आहे. मात्र, सर्व चोरीचा मुद्देमाल लगेच हस्तगत झाला नव्हता. परंतु, तपास पथकाने कौशल्याने कारवाई करत एकूण आठ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींविरुद्ध महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ४० ते ४५ घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाणे, पुणे येथेही त्यांच्याविरुद्ध दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
Comments are closed.