आयपीएलमधून थेट भारतीय संघात पुनरागमन करणार 'हा' स्टार खेळाडू? माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य
यंदाच्या आयपीएल हगामाची सुरूवात (22 मार्च) पासून होणार आहे. पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघात खेळला जाणार आहे. तत्पूर्वी सनरायझर्स हैदराबादने (SRH) मेगा लिलावात निवडल्यानंतर यंदाच्या आयपीएलमध्ये ईशान किशनला (Ishan Kishan) त्याच्या कारकिर्दीला पुनरुज्जीवित करण्याची सर्वात मोठी संधी आहे असा विश्वास माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने (Aakash Chopra) वक्तव्य केले आहे.
फलंदाजीत क्षमता असूनही ईशान किशन राष्ट्रीय निवडकर्त्यांच्या रडारवरून पूर्णपणे गायब कसा झाला? याबद्दल चोप्राने आश्चर्य व्यक्त केले आणि म्हटले की, “काहीही कारण असो, तो रडारवरून पूर्णपणे गायब झाला? असे दिसते की कोणीही त्यांच्याबद्दल बोलत नाही किंवा त्यांचे महत्त्व समजत नाही. तो रणजी ट्रॉफीमध्येही खेळला आणि तिथे धावा केल्या, तो सर्व काही करत आहे, पण कोणीही त्याच्याबद्दल बोलत नाही. पण आता त्याला भारतीय संघात पुनरागमन करण्याची मोठी संधी आहे.”
शेवटच्या आयपीएल हंगामात किशन मुंबई इंडियन्समध्ये होता. पण आगामी आयपीएल हंगामासाठी संघाने त्याला कायम ठेवले नाही. त्यानंतर गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या आयपीएल लिलावात हैदराबादने 11.25 कोटी रुपयांना विकत घेतले.
डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध विक्रमी वनडे द्विशतक (131 चेंडूत 210 धावा) झळकावूनही, किशनला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आणि शुबमन गिलला सलामीवीर म्हणून पसंती देण्यात आली. तेव्हापासून, त्याला सर्व फॉरमॅटमध्ये संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे.
ईशान किशनने गेल्या वर्षी बीसीसीआयचा केंद्रीय करारही गमावला. यावर चोप्रा म्हणाला, “तुम्ही पुन्हा चर्चेत येऊ शकता. जो यष्टीरक्षक फलंदाज वरच्या फळीत सलामीला येऊ शकतो किंवा फलंदाजी करू शकतो तो चांगला असतो. गौतम (गंभीर) तरीही म्हणतो की ते सर्व एका ट्रेनमधील बोगे आहेत. सर्वांना एकाच ठिकाणी जायचे आहे आणि बोगी पुढे आहे की मागे हे महत्त्वाचे नाही. याचा अर्थ असा की भारतीय क्रिकेटमध्ये फलंदाजीचा क्रम आता अस्तित्वात नाही.”
Comments are closed.