रोहित शर्मानंतर भारताचा भावी कर्णधार कोण? माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी

यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (ICC Champions Trophy 2025) भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे. भारताच्या या चमकदार कामगिरीमुळे भारतीय संघ ट्रॉफीपासून फार दूर नाही. दरम्यान कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) सर्वत्र कौतुक होत आहे. पण आता रोहित त्याच्या कारकिर्दीच्या उंबरठ्यावर आहे.

अशा परिस्थितीत, भारतीय संघ व्यवस्थापन भविष्यासाठी रोडमॅप तयार करण्यात व्यस्त आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर (Sanjay Bangar) यांनी भारतीय संघाच्या भावी कर्णधाराची भविष्यवाणी केली आहे. दरम्यान युवा स्टार खेळाडू शुबमन गिलच्या (Shubman Gill) फटक्यांनी आणि टेकनिकने समालोचन करताना नवजोत सिंग सिद्धू देखील प्रभावित झाले. त्यामुळे त्यांनी बांगर यांच्या मुद्द्यालाही पाठिंबा दिला.

रविवारी (23 फेब्रुवारी) चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानला 6 गडी राखून धूळ चारली. दरम्यान शुबमन गिलने (Shubman Gill) 46 धावा केल्या. याआधी त्याने बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले होते.

बांगर यांनी जिओहॉटस्टारला सांगितले की, “येत्या काही वर्षांत शुबमन गिलच भारतीय संघाची जबाबदारी घेणारा खेळाडू आहे हे स्पष्ट आहे. त्याचा पाया खरोखरच मजबूत आहे आणि यामध्ये वनडे सामन्यांमधील जवळजवळ अडीच वर्षांच्या कामगिरीचा आत्मविश्वास समाविष्ट आहे. वनडे क्रिकेटमध्ये तो अद्भुत आहे. त्याचे टायमिंग खूपच परफेक्ट आहे.”

50 षटकांच्या फॉर्मेटमध्ये उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या गिलचेही सिद्धूने कौतुक केले. सिद्धू म्हणाला, “हे बघा, वडाच्या झाडाखाली काहीही उगवत नाही आणि भारतीय क्रिकेटचे वडाचे झाड मुळात रोहित शर्मा आणि विराट कोहली आहेत. पण जेव्हा तुम्ही शुबमन गिलकडे पाहता तेव्हा हा खेळाडू त्या वडाच्या झाडाच्या सावलीतून बाहेर आला आहे आणि परिपक्व झाला आहे.”

केएल राहुल (KL Rahul), रिषभ पंत (Rishabh Pant) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हे देखील कर्णधारपदाच्या शर्यतीत आहेत. केएल राहुल सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संघाचा भाग आहे. पण सध्या पंतला संधी मिळालेली नाही.

त्याचबरोबर हार्दिक पांड्या भारतीय संघाचा कर्णधारही राहिला आहे. पण टी20 मध्ये त्याला बाजूला करण्यात आले आणि सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) कर्णधार बनवण्यात आले. त्याच वेळी हार्दिकच्या जागी शुबमन गिलला उपकर्णधारपद देण्यात आले. अशा परिस्थितीत गिलला भविष्यातील कर्णधार मानले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

किंग नक्की कोण, बाबर की कोहली? वहाब रियाजने काय दिले उत्तर!
भारत-पाक सामन्यात शानदार क्षेत्ररक्षण! शिखर धवनने केला या खेळाडूचा गौरव
दुबईत भारतीय संघाला धक्का, पाकिस्तानचा मोठा विजय ,बाबर-रिझवान चमकले

Comments are closed.