माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

50 वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय भूमिका बजावणाऱ्या राज्याच्या माजी महसूलमंत्री, कोरेगावच्या माजी आमदार डॉ. शालिनीताई वसंतदादा पाटील यांच्यावर आज सकाळी 11 वाजता येथील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉ. शालिनीताई पाटील यांचे पार्थिव आज कोरेगाव तालुक्यातील सातारा रोड पाडळी येथील वसंतदादा पाटील विद्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी सातारा जिह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी व राजकीय नेत्यांनी त्याचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. यामध्ये राजमाता कल्पनाराजे भोसले, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, सुनील माने यांची उपस्थिती होती. सकाळी सजवलेल्या रथातून त्यांचे पार्थिव येथील वैकुंठ भूमीत आणण्यात आले. यावेळी जिह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, सांगलीचे खासदार विशाल पाटील, राज्यसभा खासदार नितीनकाका पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, कोरेगावचे आमदार महेश शिंदे, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, तालीम संघाचे साहेबराव पवार, यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी डॉ. शालिनीताई पाटील यांना श्रद्धांजली वाहिली.

पोलिसांची मानवंदना

राज्याच्या माजी महसूलमंत्री, आमदार, खासदार अशा विविध पदांवर सलग 50 वर्षे कार्यरत असलेल्या डॉ. शालिनीताई पाटील (वय 94) यांचे शनिवारी (दि. 20) मुंबई येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले होते. आज डॉ. शालिनीताई पाटील यांचे पार्थिव सातारा रोड, पाडळी येथील वसना नदी तीरावर आणल्यानंतर सातारा पोलिसांनी मानवंदना दिली.

Comments are closed.