भारतीय फलंदाजांचा खेळ पाहून माजी पाकिस्तानी खेळाडू हादरला? केली सामना रद्द होण्याची प्रार्थना!

आशिया कप 2025 (Asia Cup 2025) स्पर्धेची चर्चा सुरू झाली आहे. 9 सप्टेंबरपासून 8 देशांमध्ये जोरदार स्पर्धेची सुरुवात होणार आहे. मात्र सगळ्यांना सर्वात जास्त प्रतिक्षा आहे ती 14 सप्टेंबरची. या दिवशी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील महामुकाबला रंगणार आहे. पण सगळ्यांच्या नजरा याकडेही आहेत की टीम इंडिया (Team india) पाकिस्तानविरुद्धचा सामना बहिष्कृत तर करणार नाही ना.

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्समध्ये माजी भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध दोन वेळा खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे पाकिस्तानचा माजी खेळाडू बासित अलीला (Basit Ali) आशा आहे की, भारतीय खेळाडू आशिया कपमध्येही पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार देतील. बासित अलीचं म्हणणं आहे की, जर भारतीय फलंदाज आणि पाकिस्तानचे गोलंदाज आमनेसामने आले, तर भारतीय फलंदाज जोरदार धुलाई करतील.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अलीने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना सांगितलं, मी प्रार्थना करतो की भारत आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार देईल. अगदी तसंच जसं त्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्समध्ये केलं होतं. भारतीय फलंदाज इतक्या चांगल्या प्रकारे खेळतील की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानची भिडंत नियोजित कार्यक्रमानुसार 14 सप्टेंबरला होणार आहे.

सध्या पाकिस्तान क्रिकेट संघाची अवस्था अतिशय वाईट आहे. नुकत्याच वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या 3 वनडे सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानला 1-2 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. मालिकेच्या शेवटच्या सामन्यात तर कॅरिबियन संघाने पाकिस्तानला तब्बल 202 धावांनी हरवलं.

संपूर्ण मालिकेत पाकिस्तानच्या फलंदाजांनी अतिशय निराशाजनक खेळ केला. शेवटच्या सामन्यात संपूर्ण संघ फक्त 92 धावांत गारद झाला. बाबर आझम, मोहम्मद रिजवान, सलमान आगा यांसारख्या स्टार खेळाडूंनी सजलेला फलंदाजी क्रम हा पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला.

Comments are closed.