Ludek Miklosko – फुटबॉलचा ‘हॅमर’ हरपला!
फुटबॉलच्या मैदानावर आपल्या भक्कम बचावाने प्रतिस्पर्थ्यांना रोखणारे झेक प्रजासत्ताकचे माजी गोलरक्षक आणि वेस्ट हॅमचे दिग्गज लुडेक मिकलोस्को यांचे प्रदीर्घ आणि गंभीर आजाराशी झुंज देताना वयाच्या ६४व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने झेक फुटबॉलसह इंग्लिश फुटबालविश्वावर शोककळा पसरली आहे.
मिकलोस्को हे वेस्ट हॅमच्या इतिहासातील अविस्मरणीय खेळाडूंपैकी एक होते. त्यांनी क्लबकडून ३०० हून अधिक सामने खेळले. १९९० ते १९९८ या काळात वेस्ट हॅमकडून खेळल्यानंतर त्यांनी १९९८ ते २००१ दरम्यान क्यूपीआरकडूनही खेळ केला. १९९०-९१ च्या मोसमात त्यांना वेस्ट हॅमचा ‘हॅमर ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाला होता. मिकलोस्को यांनी राष्ट्रीय संघासाठीही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी १९८२ ते १९९२ या काळात झेकोस्लोव्हाकियाचे, तर १९९६ आणि १९९७मध्ये झेक प्रजासत्ताकचे प्रतिनिधित्व केले. २०२१ मध्ये मिकलोस्को यांना कॅन्सरचे निदान झाले होते. प्रदीर्घ उपचारानंतर डिसेंबर २०२४ मध्ये त्यांनी उपचार थांबवण्याचा निर्णय घेतला. अखेर दीर्घ आजाराशी लढा देताना त्यांची प्राणज्योत मालवली.
Comments are closed.