वनडे क्रिकेटमध्ये 500 धावांचा टप्पा पार होणार? वेस्ट इंडिजच्या या माजी दिग्गजाने केला खळबळजनक दावा!

वनडे क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत एकदाही 500 धावांचा टप्पा कोणत्याही संघाला गाठता आलेला नाही. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वनडेतील सर्वाधिक धावसंख्या 498/4 आहे. इंग्लंडने 2022 मध्ये नेदरलँड्सविरुद्ध हा विक्रम केला होता. 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये ही धावसंख्या पाहून चाहतेही थक्क झाले होते. मात्र, वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने (Devon Bravo big Prediction) आता वनडेमध्ये 500 धावाही होऊ शकतात, असा खळबळजनक दावा केला आहे.

ब्राव्होच्या या दाव्यामुळे गोलंदाजांची चिंता नक्कीच वाढू शकते. फलंदाजांचे वाढते वर्चस्व पाहता वनडेमध्ये 500 धावा करणे आता फार मोठी गोष्ट राहिलेली नाही, असे ब्राव्होचे मत आहे. यासोबतच त्याने गोलंदाजांनाही महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

वेस्ट इंडिजच्या माजी अष्टपैलू खेळाडूने सांगितले की, फलंदाजांच्या कौशल्यात मोठी सुधारणा झाली आहे. त्यामुळे गोलंदाजांनीही स्वतःला प्रभावी ठेवण्यासाठी आपल्या कौशल्यात सुधारणा करणे गरजेचे आहे.

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सदरम्यान ड्वेन ब्राव्हो म्हणाला, “फलंदाजांच्या कौशल्यात खूप सुधारणा झाली आहे. आता गोलंदाजांनीही सुधारणा करून आपल्या खेळात नवीन गोष्टींचा समावेश करायला हवा. जागतिक क्रिकेटमध्ये होत असलेल्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी त्यांना आपले कौशल्य वाढवावे लागेल.

ब्राव्हो पुढे म्हणाला, खेळ बदलत आहे. खेळाचा वेग वाढला आहे आणि हे चांगले आहे. मात्र, गोलंदाजांनाही त्यानुसार स्वतःमध्ये बदल करावे लागतील. फलंदाज ज्या पद्धतीने निर्भीडपणे फलंदाजी करत आहेत, ते पाहता मला आनंद आहे की मी क्रिकेट खेळणे सोडले आहे.

वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक 5 धावसंख्यांमध्ये इंग्लंडचे नाव तीन वेळा आहे. या यादीतील पहिल्या तीन सर्वाधिक धावसंख्या इंग्लंडनेच केल्या आहेत. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका आहेत. भारत या यादीत 11व्या क्रमांकावर असून त्याच्या नावावर 418/5 अशी धावसंख्या आहे.

  • इंग्लंड – 498/4 धावा विरुद्ध नेदरलँड्स, 2022
  • इंग्लंड – 481/6 धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2018
  • इंग्लंड – 444/3 धावा विरुद्ध पाकिस्तान, 2016
  • श्रीलंका – 443/9 धावा विरुद्ध नेदरलँड्स, 2006
  • दक्षिण आफ्रिका – 439/2 धावा विरुद्ध वेस्ट इंडिज, 2015

Comments are closed.