त्याला पहिल्या सामन्यापासून खेळवायला हवं होतं..', टीम इंडियाच्या पराभवानंतर इरफान पठाण का संतापले?

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 3 सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंडने भारताचा 2-1 ने पराभव केला आणि भारतीय भूमीवर पहिल्यांदाच वनडे मालिका जिंकण्याचा इतिहास रचला. शेवटच्या सामन्यात नितीश कुमार रेड्डीने (Nitish Kumar Reddy) भारतासाठी शानदार कामगिरी करत अर्धशतक झळकावले. आता माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने (Irfan Pathan on nitish kumar Reddy) नितीश रेड्डीबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. इरफानच्या मते, नितीशला पहिल्या सामन्यापासूनच प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळायला हवी होती.

नितीश रेड्डीला शेवटच्या दोन सामन्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले होते, पण पहिल्या सामन्यात त्याला खेळवले गेले नव्हते. आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना इरफान म्हणाला की, नितीश रेड्डीने ज्या प्रकारे 135 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली, त्यावरून हे स्पष्ट होते की त्याच्यामध्ये हार्दिक पांड्याचा (Hardik pandya) उत्तम पर्याय (Backup) बनण्याची क्षमता आहे. जरी तो काही सामन्यांत अपयशी ठरला, तरी संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास दाखवला पाहिजे. यामुळे भारताला एक चांगला अष्टपैलू मिळू शकेल.

न्यूझीलंडविरुद्धच्या या वनडे मालिकेत हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली होती आणि त्याच्या जागी नितीश रेड्डीला संधी दिली गेली होती. हार्दिक आता न्यूझीलंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत पुनरागमन करणार असून त्यानंतर तो 2026 च्या वर्ल्ड कपमध्येही भारताचे प्रतिनिधित्व करेल. भारतीय संघाने या मालिकेतील पहिला सामना जिंकला होता, पण त्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन केले. तिसरा आणि निर्णायक सामना न्यूझीलंडने 41 धावांनी जिंकून मालिका 2-1 अशी आपल्या नावावर केली.

Comments are closed.