केन-बेतवा जलविद्युत प्रकल्पाची पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्यप्रदेशात कार्यक्रम, बुंदेलखंडसाठी उपयुक्त

वृत्तसंस्था / खजुराहो

मध्यप्रदेशातील बुंदेलखंड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘केन-बेतवा’ या महत्वाकांक्षी जलपकल्पाचा शीलान्यास करण्यात आला आहे. बुधवारी हा कार्यक्रम झाला. बुंदेलखंड या पाण्याची कमतरता असणाऱ्या भागात हा प्रकल्प होत असल्याने या भागाची पाण्याची समस्या भविष्यकाळात या प्रकल्पामुळे सुटणार आहे. या प्रकल्पामुळे या भागाचा वेगाने आर्थिक विकास होणार आहे.

या प्रकल्पाचा शीलान्यास केल्यानंतर केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्याचे महत्व आणि त्यामुळे या भागात घडून येऊ शकणारे परिवर्तन यांची माहिती दिली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात जलक्रांती घडविण्यात डॉ. बाबबसाहेब आंबेडकर यांचे महत्वपूर्ण योगदान होते. तथापि, काँग्रेसने या कामाचे श्रेय त्यांना न देता, त्यांचे योगदान आणि त्याची या संबंधातील दूरदृष्टी, लोकांपासून लपवून ठेवली. ही कृती करुन काँग्रेसने डॉ. आंबेडकरांची अवमानना करण्याची आणखी एक संधी साधली अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.

जलसमस्या समजूनच घेतली नाही

भारतासाठी नदीजलाचे महत्व काय आहे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नेमकेपणाने माहीत होते. त्यांनी यासंदर्भात अनेकवेळा वक्तव्ये केली आहेत. तथापि, काँग्रेसने त्यांच्या सल्ल्यांकडे कधीच लक्ष दिले नाही. उलट आंबेडकरांचे हे दूरदृष्टीचे विचार या पक्षाने दडवून ठेवले आहेत. विकासाचे सर्व श्रेय केवळ एकाच व्यक्तीला देण्याच्या नशेत आंबेडकारांचे विचार अडगळीत टाकण्यात आले. देश स्वतंत्र झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या नद्यांचा विकास करणे, त्यांच्या पाण्याचा उपयोग देशाच्या विकासासाठी करणे आदी कार्ये केली. काँग्रेसने केवळ घोषणा करण्यावाचून दुसरे काही केले नाही, असा आरोप त्यांनी केला.

आमच्या काळातच सुशासन

सुशासन किंवा गुड गव्हर्नन्स ही संकल्पना खऱ्या अर्थाने आमच्या प्रशासनानेच लागू केली आहे. ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकास, स्वच्छता अभियान, खेड्यांमधील लोकांना नळाद्वारे पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविणे इत्यादी कामे आम्ही केली. मध्यप्रदेशात अटल ग्रामसेवा सदन योजनेअंतर्गत 1,100 प्रकल्पांवर आज बुधवारपासून कामाचा प्रारंभ होत आहे. या प्रकल्पांमुळे मध्यप्रदेशच्या ग्रामीण भागामध्ये मोठे परिवर्तन होणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी भाषणात केले.

मुख्यमंत्र्यांकडून आभार

हा महत्वाचा प्रकल्प मध्यप्रदेशात आणल्यामुळे या राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. केन-बेतवा प्रकल्पामुळे बुंदेलखंडसारख्या दुष्काळी भागाचा कायापालट होणार आहे. या भागातील पाण्याची टंचाई संपुष्टात येऊन कृषी आणि उद्योग यांचा लाभ होणार आहे. या प्रकल्पामुळे बुंदेलखंड सशक्त आणि समृद्ध होईल. हा प्रकल्प या भागाची जीवनादायिनी ठरेल, अशी भलावण मोहन यादव यांनी केली आहे.

काय आहे हा प्रकल्प

बुंदेलखंडातील केन आणि बेतवा या दोन नद्यांना या प्रकल्पाच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील जलसमृद्धीत भर पडणार आहे. केन आणि बेतवा या नद्या या भागातून वहात असल्या तरी, त्यांच्या पाण्याचा लाभ या भागाला होत नाही. ही त्रुटी या प्रकल्पामुळे दूर होण्याची शक्यता आहे. दोन नद्यांना एकत्र जोडल्याने पाणीसाठा वाढणार असून या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग बुंदेलखंडाच्या दुष्काळी आणि शुष्क भागाला होणार आहे. या प्रकल्पाची मागणी गेल्या सहा दशकांपासून केली जात होती. ती आता पूर्ण होणार आहे.

Comments are closed.