अहिल्यानगरात शिंदे गटाचे चार अर्ज बाद

महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाची प्रचंड प्रशासकीय व संघटनात्मक अडचण उघड झाली आहे. उमेदवारांना दिलेल्या ए व बी फॉर्ममध्ये इतक्या गंभीर चुका आढळल्या की चौघांचे उमेदवारी अर्जच बाद होण्याची नामुष्की शिंदे गटावर ओढावली आहे. आता हे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहेत.

पक्षांच्या निष्काळजीपणामुळे अनेक उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्याचे चित्र निर्माण झाले असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अहिल्यानगर महापालिका निवडणूक २०२५ संदर्भात जोडपत्र क्रमांक २ (ए व बी फॉर्म) मधील दुरुस्त्यांसाठी शिंदे गटाने थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. अधिकृत व मान्यताप्राप्त पक्ष सचिव संजय भाऊराव मोरे यांनी लेखी पत्र सादर करत, ‘त्रुटी तांत्रिक स्वरूपाच्या आहेत. त्या दूर करून उमेदवारांना निवडणूक लढवण्याची संधी द्यावी,’ अशी मागणी केली आहे. मात्र, निवडणूक नियमांसमोर राजकीय विनवण्या चालणार का, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान शिंदे गटाचा गोंधळ एकामागोमाग एक उघड होत गेला. प्रभाग क्रमांक ८ मध्ये राहुल कातोरे यांच्या उमेदवारी अर्जावर अनुमोदकाच्या सहीवर आक्षेप घेण्यात आला. प्रत्यक्ष पडताळणीत सही चुकीची ठरल्याने अर्ज थेट अवैध ठरवण्यात आला. विशेष म्हणजे त्यांनी अपक्ष अर्जही भरलेला नव्हता. पक्षाच्या हलगर्जीपणाचा फटका उमेदवारालाच बसला.

प्रभाग क्रमांक ६ मध्ये विशाल शितोळे यांचा शिंदे गटाचा अर्ज ए व बी फॉर्म नसल्याने बाद करण्यात आला. मात्र, अपक्ष अर्ज वैध ठरला. याच प्रभागातील अमित खामकर यांनी ए व बी फॉर्मची केवळ झेरॉक्स प्रत जोडली, त्यामुळे त्यांचीही शिवसेनेकडील उमेदवारी बाद झाली. अपक्ष अर्ज मात्र वैध राहिला.

प्रभाग क्रमांक १६ मधील हर्षवर्धन कोतकर आणि प्रभाग क्रमांक १७ मधील गौरी नन्नावरे यांच्या ए व बी फॉर्ममध्ये खाडाखोड आढळून आल्याने दोघांचेही शिंदे गटाकडील अर्ज बाद करण्यात आले. दोघांचे अपक्ष अर्ज मात्र वैध ठरले आहेत.

उमेदवारी अर्ज, ए व बी फॉर्म, सही, खाडाखोड अशा प्राथमिक बाबींमध्येच गोंधळ उडाल्याने शिंदे गटातील संघटनात्मक कमकुवतपणा चव्हाट्यावर आला आहे. निवडणूक रणधुमाळीच्या तोंडावरच शिंदे गटातील उमेदवार गोंधळात सापडले असून, पुढील सुनावणीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

छाननीत ७७१ अर्ज वैध

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत अर्ज छाननीनंतर एकूण ७८८ उमेदवारी अर्जांपैकी १७ अर्ज फेटाळण्यात आले असून, ७७१ अर्ज वैध ठरले आहेत. छाननीदरम्यान कागदपत्रांतील त्रुटी, अपूर्ण माहिती व नियमांची पूर्तता न झाल्याने संबंधित अर्ज रद्द करण्यात आले. अर्ज वैध ठरल्यानंतर आता उमेदवारांना माघार घेण्याच्या प्रक्रियेपर्यंत वेळ देण्यात येणार असून, त्यानंतरच अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

भाजपचे शहराध्यक्ष–शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष यांच्यात शाब्दिक चकमक

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान महायुतीत मोठा तणाव निर्माण झाला. भाजपचे शहराध्यक्ष अनिल मोहिते आणि एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. या वादाचे कारण मोहिते यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली अतिक्रमणासंदर्भातील हरकत ठरली.

भाजप शहराध्यक्ष अनिल मोहिते यांचा मुलगा सुजय मोहिते हा एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांच्या विरोधात रिंगणात असल्याने ही लढत लक्षवेधी ठरणार आहे. या थेट लढतीमुळे दोन्ही पक्षांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनिल शिंदे यांनी मोहिते यांच्याविरोधात अतिक्रमण केल्याचा आक्षेप नोंदवला होता. या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंना नोटीस बजावून आपापले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले. दुपारी तीननंतर अनिल मोहिते यांनी आपले स्पष्टीकरण सादर केले. दरम्यान, अर्ज छाननीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

भाजपमधील निष्ठावंतांना ‘कात्रजचा घाट’

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपने निष्ठावंत पदाधिकाऱ्यांसह माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे काहींनी शिंदे गटातून तसेच अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. याउलट भाजप जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांचे पुत्र सुजय मोहिते यांना उमेदवारी दिल्याने निष्ठावंतांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.

केडगावातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजपचे निष्ठावंत साहेबराव विधाते, धनंजय जामगावकर यांना धक्का बसला. प्रभाग क्रमांक १७ मध्ये केडगाव भाजप मंडलाध्यक्ष भरत ठुबे यांच्या पत्नीला तिकीट नाकारण्यात आले. तसेच भाजप नगरसेविका गौरी नन्नावरे यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिंदे गटातून अर्ज दाखल केला आहे. नगरसेविका लता शेळके यांच्या जागी कमल जालिंदर कोतकर यांना उमेदवारी देण्यात आली. राहुल कांबळे यांचा पत्ता कट करण्यात आला. सावेडी मंडलाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांच्या पत्नी मनीषा बाररस्कर यांनाही डावलण्यात आले.

भाजपने माजी नगरसेवक अजय चितळे, रवींद्र बारस्कर, पल्लवी जाधव, राहुल कांबळे, लता शेळके, गौरी नन्नावरे, संगीता खरमाळे, नितीन शेलार, रामदास अंधाळे यांना उमेदवारी नाकारली आहे. माजी नगरसेविका संगीता खरमाळे व नितीन शेलार यांनी शिंदे गटातून अर्ज दाखल केला आहे. सावेडी मंडलाध्यक्ष सीए राजेंद्र काळे, मयूर बोचुघोळ, माजी सभापती नरेंद्र कुलकर्णी, वसंत लोढा, बाळासाहेब गायकवाड, प्रशांत मुथा, राम वडागळे, कैलास गर्जे, साहेबराव विधाते, पंकज जहागीरदार या निष्ठावंतांनाही भाजपने डावलून बाहेरून पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे.

Comments are closed.