ज्वेलर्सच्या दुकानात चोरी प्रकरणी चौघांना अटक
मालाड येथील ज्वेलर्सच्या दुकानातून 1 कोटी 30 लाख रुपयांचे सोने चोरी प्रकरणी चौघांना मालाड पोलिसांनी अटक केली. खुमानसिंह दसाना, सोहनसिंह तुलसीसिंह दसाना, खुमानसिंह भुरसिंह दसाना, गणेशसिंह कडेचा अशी त्या चौघांची नावे आहेत. त्या चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.
तक्रारदार ज्वेलर्सचे व्यापारी असून त्याचे मालाड येथे ज्वेलर्सचे दुकान आहे. त्याच्याकडे तीन नोकर कामाला आहेत. त्यापैकी एक नोकर हा त्याचा नातेवाईक असून तो त्याच्याकडे राहत होता. तक्रारदार हे त्याच्यावर दुकानाची जबाबदारी सोपवून बाहेर जात असायचे. 2 ऑक्टोबरला तक्रारदार हे देवदर्शनासाठी राजस्थान येथे गेले होते. त्यामुळे त्याने दुकानाची चावी एका नोकराकडे दिली होती. 3 ऑक्टोबरला एक नोकर हा दुकानात आला. मात्र त्याच्याकडील पाच चाव्यांपैकी एकाही चावीने दुकानाचे टाळे उघडले नाही. हा प्रकार त्यांना संशयास्पद वाटल्याने त्याने खुमानसिहला पह्न केला. त्याचा पह्न बंद होता. याची माहिती तक्रारदार यांना देण्यात आली.
तक्रारदार हे मुंबईत आले. त्याने दुकानाचे लॉक तोडून आत प्रवेश केला. तेव्हा त्याच्या दुकानात चोरी झाल्याचे उघड झाले. त्याने दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तेव्हा खुमानसिंह हा त्याच्या तीन साथीदारांसोबत पिशवीतून सोन्या-चांदीचे दागिने घेऊन जात असल्याचे उघड झाले. याची माहिती मालाड पोलिसांना देण्यात आली. काही वेळात मालाड पोलीस घटनास्थळी आले. मालाड पोलिसांनी चारजणांविरोधात गुन्हा नोंद केला. तपासासाठी एक पथक तयार करण्यात आले. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या माध्यमातून पोलिसांनी त्या चौघांना विविध ठिकाणांहून ताब्यात घेऊन अटक केली.
Comments are closed.