मनोरी बीचजवळ अडकलेल्या जहाजावर चार मृतदेह सापडले
गोराई-मनोरी बीचजवळ चार महिन्यांपासून अडकलेल्या जहाजावर चार जणांचे मृतदेह सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. हे चौघेही चोरीच्या उद्देशाने जहाजात घुसले असावे आणि जहाजातील गॅस गळतीमुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेत चौघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्याच्या अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
जहाजावर यापूर्वीही दोन वेळा चोरी झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार लोखंड चोरी करण्याच्या उद्देशाने आठ जण स्पीड बोटीने जहाजावर पोहचले. त्यातील एक जण स्पीड बोटवर थांबला आणि त्याचे सात साथीदार जहाजात शिरले. त्यातील चौघेजण जहाजातील पाईप कापण्यासाठी आत गेले. दरम्यान पाईप कापल्यामुळे गॅस गळती होऊन त्या चौघांचा तेथेच गुदमरून मृत्यू झाला असावा, असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मालकाचा शोध सुरू
समुद्रकिनाऱ्यावर जहाज अडकल्यानंतर पोलिसांनी जहाजाच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या जहाजाचा मालक फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या जहाजाचा वापर अवैध तेल व्यापारासाठी केला जात असल्याचा संशय पोलिसांना असून त्या दिशेने पोलीस तपास करत आहेत.
Comments are closed.