आसाम दुर्घटनेतून चार मृतदेह बाहेर काढले
खाणीमध्ये अजूनही पाच कामगार अडकलेलेच : बचावकार्य सुरू
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाममधील दिमा हासाओ जिह्यातील 300 फूट खोल कोळसा खाणीतून आतापर्यंत चार कामगारांचे मृतदेह सापडले आहेत. शनिवारी तीन मृतदेह सापडले. त्यापैकी एक सकाळी आणि दोन दुपारी आढळले. शनिवारी सकाळी 27 वर्षीय लिझन मगरचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. तो कलामाटी गाव क्रमांक 1, दिमा हासाओ येथील रहिवासी होता. अन्य दोघांची ओळख उघड झालेली नाही. यापूर्वी बुधवारी तत्पूर्वी, नेपाळमधील रहिवासी गंगा बहादूर श्रेठ यांचा मृतदेह आढळला होता. उर्वरित 5 कामगारांसाठी बचावकार्य अजूनही सुरू आहे.
शनिवारी सकाळी एनडीआरएफची टीम पाण्याची पातळी तपासण्यासाठी गेली असता लिझन मगरचा मृतदेह तरंगताना दिसला. सकाळी 7:30 च्या सुमारास त्याला बाहेर काढण्यात आले. खाणीतील पाण्याची पातळी 6 मीटरने कमी झाली आहे. 5 पंप वापरून रात्रभर पाणी बाहेर काढण्यात येत आहे. खाणीत पाणी घुसल्यामुळे आतील कर्मचाऱ्यांशी संपर्क होऊ शकलेला नाही.
दोन जणांना अटक, दोघांविरुद्ध गुन्हा
खाण दुर्घटनेसंदर्भात आसाम पोलिसांनी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याचे नाव हनान लस्कर असे आहे. खाण मालकाने हनान याला व्यवस्थापक बनवले होते. तो मजुरांच्या पगाराची व्यवस्थाही पाहत होता. या घटनेनंतर हनान लगेच पळून गेला. गुरुवारी रात्री शोध मोहिमेनंतर हनानला अटक करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी पुनुश नुनिसा यालाही अटक केली होती.
या दुर्घटनेप्रकरणी काँग्रेसच्या दिमा हासाओ युनिटचे कोम केम्पराय आणि पितुश लंगथासा यांनी नॉर्थ कचर हिल्स ऑटोनॉमस कौन्सिलचे मुख्य कार्यकारी सदस्य (सीईएम) देबोलाल गोर्लोसा आणि त्यांची पत्नी कनिका होजाई यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये गोर्लोसा आणि होजाई यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे दोघेही खाणीत बेकायदेशीर उत्खनन करत असल्याचा दावा केला जात आहे.
एसआयटी स्थापन करण्याची काँग्रेसची मागणी
दरम्यान, लोकसभा खासदार गौरव गोगोई यांनी खाण दुर्घटनेबाबत पंतप्रधान मोदींना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे. पीडित कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी असल्याचे गौरव गोगोई यांनी म्हटले आहे.
Comments are closed.