छत्तीसगडमध्ये वीज पडून चौघांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात पूल-रस्ते पाण्याखाली : केदारनाथ ट्रेकिंग मार्गावर भूस्खलन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

छत्तीसगडच्या जांजगीर-चंपा जिह्यात शनिवारी रात्री विविध ठिकाणी वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला. तसेच या घटनांमध्ये इतर तीन जण जखमी झाले. राज्यात रविवारीदेखील पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू होता. परतीच्या पावसामुळे रायपूर, दुर्ग, बेमेतरा, बालोद, कबीरधाम, राजनांदगाव आणि विजापूर जिह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. सीतापूरमध्ये नदीचे पाणी छोट्या पुलांवरून वाहत आहे. रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. रविवारी सकाळपासून लखनौ, कानपूर, वाराणसी आणि प्रयागराजसह बहुतेक शहरांमध्ये हवामान स्वच्छ आहे. दरम्यान, सहा जिह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे केदारनाथ ट्रेकिंग मार्गावरील चिरबासाजवळ भूस्खलन होत आहे. डोंगरावरून मोठे दगड कोसळल्यामुळे प्रशासनाने सकाळी 9 वाजेपर्यंत यात्रा स्थगित केली. या काळात यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले होते. सकाळी 9 वाजेनंतर यात्रा पुन्हा सुरू झाली. दरम्यान, राजस्थानमधून मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. हवामान विभागाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 3-4 दिवसात पंजाब आणि सौराष्ट्र-कच्छच्या काही भागांतूनही मान्सून परत जाईल. मान्सूनच्या माघारीमुळे या भागांतील पावसाचे प्रमाण हळूहळू कमी होईल.

Comments are closed.