बांगलादेशात हिंदू कुटुंबातील चौघांची गळा दाबून हत्या

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बांगलादेशातील रंगपूर शहरात एका हिंदू कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाला. बंद घरामध्ये निवृत्त शिक्षक, त्यांची पत्नी, मुलगी आणि 12 वर्षांच्या मुलाचे मृतदेह आढळून आले आहेत. या चौघांचीही गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

रंगपूर शहरातील दासपारा (मछुआपारा) परिसरात शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास चारही मृतदेह सापडले. निवृत्त शिक्षक गणपती चक्रवर्ती (65), त्यांची पत्नी प्रीतिलता चक्रवर्ती (50), मुलगी अगामी चक्रवर्ती  (23) आणि मुलगा प्रियम चक्रवर्ती (12) अशी मृतांची नावे आहेत. आई आणि मुलीचा मृतदेह घराच्या पायऱ्यांवर, गणपती चक्रवर्ती यांचा मृतदेह छतावर, तर 12 वर्षांच्या मुलाचा मृतदेह बेडखाली आढळून आला. सध्या पोलीस, सीआयडी आणि डिटेक्टिव्ह ब्रांच या तिन्ही यंत्रणा संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दोन दिवस फोन बंद

प्रीतिलता यांची लहान बहीण पूजा चक्रवर्ती यांनी सांगितले की, गुरुवारी दुपारी बहिणीशी त्यांचे शेवटचे बोलणे झाले होते. त्यानंतर त्यांचा फोन बंद येत असल्याने नातेवाईक शनिवारी रात्री दासपारा येथील घरी पोहोचले. घराचे मुख्य गेट बंद होते आणि आतील सर्व दिवे बंद होते. यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कुलूप तोडून घरात प्रवेश केला असता, वेगवेगळ्या ठिकाणी चौघांचे मृतदेह आढळून आले.

Comments are closed.