दिल्ली कार बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी चार प्रमुख आरोपींना अटक
दिल्ली कार स्फोटप्रकरणी एनआयएची कारवाई : दहा दिवसांची कोठडी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर रोजी कारमध्ये झालेल्या स्फोटाच्या तपासात मोठी कारवाई करत आणखी 4 मुख्य आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात आता अटक केलेल्या आरोपींची एकूण संख्या 6 झाली आहे. डॉ. मुझम्मिल, आदिल, शाहीन आणि मौलवी इरफान अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून चारही आरोपींना गुरुवारी पटियाला हाऊस कोर्टात हजर केले असता 10 दिवसांच्या एनआयए रिमांडवर पाठवण्यात आले आहे.
एनआयएने चौघांना श्रीनगर येथून अटक केली. डॉ. मुझम्मिल शकील गनई (पुलवामा, जम्मू काश्मीर), डॉ. आदिल अहमद राथेर (अनंतनाग, जम्मू काश्मीर), डॉ. शाहीन सईद (लखनौ, उत्तर प्रदेश), मुफ्ती इरफान अहमद वाघाई (शोपियान, जम्मू काश्मीर) अशी संबंधितांची नावे असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. एनआयएच्या तपासानुसार, या सर्वांनी हल्ल्याचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या स्फोटात 13 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण जखमी झाले. यापूर्वी या प्रकरणात आमिर रशीद अली आणि जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश यांना अटक करण्यात आली होती. स्फोटात वापरलेली कार रशीद अलीच्या नावाने नोंदणीकृत होती.
एनआयए दहशतवादी मॉड्यूलच्या प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहे. संपूर्ण कट आणि मॉड्यूलचे नेटवर्क उघड करण्यासाठी हल्लेखोराला तांत्रिक मदत करणाऱ्या दानिशची चौकशी केली जात आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने एनआयएला या तपासाची जबाबदारी सोपवली होती. या दहशतवादी मॉड्यूलच्या प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचण्यासाठी एजन्सी देशभरातील विविध राज्यांमधील पोलिसांसोबत काम करत आहे. एनआयएची वेगवेगळी पथके दिल्लीसह जम्मू काश्मीर, हरियाणा या राज्यांमध्ये संशयितांचा शोध घेत आहेत.
Comments are closed.