17 लाख रुपयांच्या बक्षीस घेऊन चार नक्षलवादी ठार झाले
वृत्तसंस्था/ विजापूर
छत्तीसगडमधील विजापूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. 17 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या चार नक्षलवाद्यांचा चकमकीत खात्मा केल्याने नक्षलविरोधी कारवाईला बळ मिळाले आहे. चारही नक्षलवाद्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनंतर सुरक्षा दलाने शनिवारी संध्याकाळपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. यादरम्यान सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. रविवारी दुपारपर्यंत ही चकमक सुरू राहिली.
विजापूर जिह्यातील नैर्त्रुत्य भागातील बासगुडा आणि गंगलुर पोलीस ठाण्याच्या सीमावर्ती जंगलात नक्षलवादी गट कार्यरत असल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. या चकमकीत दक्षिण उपक्षेत्रीय ब्युरोचे चार नक्षलवादी ठार झाले. मृतांमध्ये ज्यात तीन एसीएम स्तर आणि एका पक्ष सदस्य कमांडरचा समावेश आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटली असून हुंगा, लाखे, भीमे आणि निहाल उर्फ राहुल अशी त्यांची नावे आहेत. हुंगा हा एसीएम, प्लाटून क्रमांक 10, दक्षिण उपक्षेत्रीय ब्युरो म्हणून सक्रीयपणे वावरत होता. त्याच्यावर सरकारने 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्याव्यतिरिक्त लाखे हिच्यावर 5 लाख, भीमे हिच्यावरही 5 लाख रुपये आणि निहाल उर्फ राहुल याच्यावर सरकारने 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
मृतदेह हस्तगत, शस्त्रसाठाही जप्त
चकमकीच्या ठिकाणाहून चार नक्षलवाद्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत. याशिवाय, घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात इन्सास आणि एसएलआर सारख्या अत्याधुनिक रायफल देखील जप्त करण्यात आल्या आहेत. शनिवारी रात्री उशिरापर्यंत परिसरात चकमक सुरूच होती. अधूनमधून गोळीबार सुरू होता. रविवारी दुपारी शोधमोहीम पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आली. या वर्षाच्या सुरुवातीपासून छत्तीसगडमध्ये एकूण 225 नक्षलवादी मारले गेले असून त्यापैकी 208 बस्तर विभागातील विजापूर, बस्तर, कांकेर, कोंडागाव, नारायणपूर, सुकमा आणि दंतेवाडा या सात जिह्यांमधील आहेत. ही आकडेवारी सुरक्षा दलांच्या कारवाईचे मोठे यश मानले जात आहे.
Comments are closed.