एम बाप पे…फ्रान्सचा मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय, सेमी फायनलमध्ये मिळवले मानाचे स्थान
अपयश ही यशाची पहिली पायरी असते, हे सर्वांनाच माहिती असते. पण ही गोष्ट तेव्हा पूर्णत्वास येते जेव्हा तुमचा तुमच्या गुणवत्तेवर विश्वास असेल, निराशा विसरून पुन्हा कामाला लागण्याची तयारी असेल आणि एकाग्रचित्त ठेवत अथक मेहनत घ्यायची तयारी असेल. ही गोष्ट पुन्हा एकदा फ्रान्सचा महानायक ठरलेल्या किलियन एम्बाप्पेबाबत ठरली. पेनल्टीसारखी सुवर्णसंधी त्याच्या हातून निसटली. पण त्याने हार मानली नाही. दुसऱ्या सत्रात अप्रतिम गोल करत त्याने संघाला विजयाची आशा दाखवली आणि विजयाची भक्कम पायाभरणी केली. त्यामुळेच फ्रान्सला मोरक्कोविरुद्धच्या सामन्यात 2-0 असा सफाईदार विजय मिळवता आला आणि सर्वप्रथम सेमी फायनल गाठण्याचा मान त्यांना मिळाला.
एम्बाप्पेने पेनेल्टी गमावली अन्…
सामन्याच्या 28 व्या मिनिटालाच फ्रान्सला पेनल्टीची सुवर्णसंधी मिळाली होती. सर्वांचा लाडका एम्बाप्पे हा ही पेनल्टी घेण्यासाठी सज्ज झाला. पण पंचांनी यावेळी जास्त वेळ काढत त्याची एकाग्रता भंग केली आणि त्याचा परिणाम एम्बाप्पेवर झाला. एम्बाप्पेला या पेनल्टीचे रूपांतर गोलमध्ये करता आले नाही. फ्रान्सच्या चाहत्यांसाठी हा एक मोठा धक्का होता.
किलर एम्बाप्पेने पहिला गोल केला
एम्बाप्पेने पेनल्टीची संधी दवडली होती. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. पण दुसऱ्या सत्रात एम्बाप्पे आपल्या खऱ्या रूपात दाखल झाला आणि देशासाठी पहिला गोल 60 व्या मिनिटाला केला. पेनल्टी एरियाच्या सीमेवर डेझिरे डोएकडून पास मिळाल्यानंतर एम्बाप्पेने आपले विलक्षण कौशल्य दाखवून दिले. तीन मोरोक्कन खेळाडूंनी वेढलेले असूनही एम्बाप्पेने बचावपटू इस्सा डिओपला चकवून प्रचंड ताकदीने चेंडू गोलपोस्टमध्ये मारला.
डेम्बेलेने आघाडी 2-0 ने वाढवली
एम्बाप्पेच्या गोलनंतर अवघ्या सहा मिनिटांत फ्रान्सने आपली आघाडी 2-0 ने वाढवली. दुसरा गोल उस्मान डेम्बेलेने केला. एम्बाप्पेकडून पास मिळाल्यानंतर त्याने हेडर मारून चेंडू उजव्या कोपऱ्यात टाकला. मोरोक्कन गोलरक्षकाने चेंडूला हात लावला, पण तो त्याला थांबवू शकला नाही.
सामन्यावर फ्रान्सचेच वर्चस्व
फ्रान्सने सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. फ्रान्सने मोरोक्कोविरुद्ध 22 शॉट्स मारले, त्यापैकी नऊ गोल पोस्टवर लागले. दुसरीकडे मोरोक्कोने मारलेल्या पाच शॉट्सपैकी फक्त एकच शॉट गोलरक्षकाच्या क्षेत्रात होता.
एम्बाप्पेने मेस्सीला मागे टाकले
‘गोल्डन बूट’च्या शर्यतीत एम्बाप्पेने लिओनेल मेस्सीला मागे टाकले आहे. 27 वर्षीय एम्बाप्पेने 2026 च्या फिफा विश्वचषकात आठ गोल केले आहेत. अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीनेही आठ गोल केले आहेत. पण मेस्सीच्या नावावर एक गोलसहाय्य आहे, पण एम्बाप्पेच्या नावावर तीन गोलसहाय्य असल्यामुळे तो अव्वल स्थानावर पोहोचला आहे. आता मेस्सी त्यांच्या उपांत्यपूर्व सामन्यात गोल करतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. एम्बाप्पेने 20 गोल केले आहेत. या स्पर्धेत सहाव्यांदा खेळणारा मेस्सी 21 गोलांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.
एम्बाप्पेचा विश्वविक्रम
फ्रान्सचा कर्णधार आणि स्टार स्ट्रायकर एम्बाप्पे पुढच्या सामन्यात केवळ एकच नाही, तर अनेक मोठे विक्रम प्रस्थापित करू शकतो. मोरोक्कोविरुद्धच्या सामन्यात त्याने गोल केला आणि वयाच्या 30 वर्षांपूर्वीच विश्वचषकात 20 गोल करणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे. आतापर्यंत रोनाल्डो असो किंवा मेस्सी यांना हा वर्ल्ड रेकॉर्ड रचता आलेला नव्हता.
सदोष पंचगिरीचा एम्बाप्पेला मोठा फटका
इजिप्तला जसा सदोष पंचगिरीचा फटका बसला, तसा फ्रान्सच्या सामन्यात तो एम्बाप्पेलाही बसला. या सामन्यात सर्वच अर्जेंटिनाचे पंच होते. अर्जेंटिनाच्या पंचांनी जेव्हा एम्बाप्पेला पेनल्टी घेण्यास सांगितले तेव्हा पाच मिनिटे त्यांनी खेळ थांबवला होता. या पाच मिनिटांत एम्बाप्पेची एकाग्रता भंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तसेच घडले. एम्बाप्पेला पेनल्टीचा फायदा उचलता आला नाही. यानंतर एम्बाप्पे पंचांवर चांगलाच भडकला होता. त्याचबरोबर मोरोक्कोचे खेळाडू एम्बाप्पेला वारंवार जखमी करण्याचा प्रयत्न करत होते, पण पंचांनी फक्त एकदाच त्याची दखल घेतली.
…त्यामुळे एम्बाप्पेने मैदान सोडलं
सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असताना एम्बाप्पेने मैदान सोडल्याचे पाहायला मिळाले. काही जणांना ही वाईट गोष्ट वाटली, पण त्यापूर्वी फ्रान्सने 2-0 अशी दमदार आघाडी घेतली होती. त्याचबरोबर एम्बाप्पेवर मोरोक्कोचे खेळाडू तुटून पडत होते. त्यामुळे त्याला कोणतीही मोठी दुखापत होऊ नये यासाठी त्याला मैदान सोडण्यास सांगण्यात आले.
Comments are closed.