केरळमधील गुरुवायूर मंदिराच्या तिजोरीत फसवणूक

सोन्याच्या मुकुटाऐवजी चांदीचे मुकुट, वजनातही घट : ऑडिट अहवालात उघड

वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम

केरळमधील गुरुवायूर येथील प्रसिद्ध कृष्ण मंदिराच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि हेराफेरी उघडकीस आली आहे. 2019-20 आणि 2020-21 च्या अहवालात मंदिरातील सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या व्यवस्थापनात गंभीर अनियमितता आणि योग्य प्रक्रियांचे पालन न केल्याचे  राज्य लेखापरीक्षण विभागाला आढळून आले आहे. अहवालानुसार, मंदिरातील दैनंदिन विधींमध्ये वापरल्या जाणाऱ्या सोन्या-चांदीच्या भांड्यांचा बाबतीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले आहे.

सोन्याच्या वस्तूंच्या जागी कधीकधी चांदीच्या वस्तू परत केल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अहवालानुसार, सोन्याच्या मुकुटाऐवजी चांदीचा मुकुट परत करण्यात आला. दहा महिन्यांत एका चांदीच्या भांड्याचे वजन 1.19 किलोने कमी झाले. तसेच एका चांदीच्या दिव्याचे वजनही बरेच कमी झाले. 2.65 किलो चांदीच्या भांड्याऐवजी फक्त 750 ग्रॅम वजनाचे भांडे माघारी आणण्यात आल्याचे ऑडिटमध्ये दिसून आले. तसेच मंदिर व्यवस्थापनाकडे असलेल्या हस्तिदंताच्या बाबतीतही मोठी अफरातफर झाली असून याप्रकरणी कोणताही गुन्हा नोंद झालेला नाही.

Comments are closed.