खरेदीचा बहाणा करून रक्कम करायचे लंपास, बंटी-बबली अटकेत

शोरूममध्ये वस्तू खरेदीचा बहाणा करून कॅश काऊंटरमधील पैसे चोरणाऱ्या बंटी बबलीला खार पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मिलन वाथीयाथ आणि अतुल वाथीयाथ अशी त्या दोघांची नावे असून ते पती पत्नी आहेत. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
खार येथे एक शोरूम आहे. गेल्या आठवडय़ात एक जोडपे खरेदीसाठी त्या शोरूममध्ये आले तेव्हा शोरूममधील कर्मचाऱयाने त्यांना काही कपडे दाखवले. कर्मचारी हे कपडे दाखवण्यास व्यस्त असताना कॅश काऊंटरमधील 53 हजार रुपये त्या बंटी बबलीने चोरले. पैसे चोरल्यानंतर त्याने कपडे पसंद नसल्याचे सांगून ते दोघे तेथून निघून गेले. काही वेळाने कर्मचाऱयाने कॅश काऊंटरची पाहणी केली तेव्हा त्यात 53 हजार रुपये नसल्याचे त्याच्या लक्षात आले. पैसे चोरीला गेल्याने त्याने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. घडल्याप्रकरणी शोरूमच्या कर्मचाऱयाने खार पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तपासासाठी एक पथक तयार केले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी खार परिसरातील शोरूमजवळ साध्या वेशात सापळा रचला. सापळा रचून त्या पोलिसांनी मिलन आणि अतुलला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने चोरीची कबुली दिली. ते दोघे केरळचे रहिवासी आहेत.
खरेदीचा बहाणा करून दुकानातील कर्मचाऱयांशी गप्पा मारून ड्रॉवरमधील कॅश लांबवतात.
मुंबई, दिल्ली, भोपाळ, चेन्नई, जबलपूर, बंगळुरू, नागपूर, नाशिक, ठाणे या ठिकाणी अशा प्रकारचे केले गुन्हे.
Comments are closed.