भारत आणि ओमान यांच्यात मुक्त व्यापार करार होण्याच्या मार्गावर आहे.
केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल यांच्याकडून संमती
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारत आणि ओमान यांच्यात आज गुरुवारी मुक्त व्यापार करार होणार आहे. या वृत्ताला केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी संमती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी रात्री इथियोपिया दौरा आटोपून ओमानला पोहचले आहेत. त्यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांमध्ये हा मुक्त व्यापार करार केला जाणार आहे. भारत आणि ओमान यांच्यातील व्यापारी संबंध दृढ आहेत. ते अधिक बळकट करण्यासाठी या कराराचा उपयोग होणार आहे. वस्त्रप्रावरणे, पादत्राणे, वाहने, मौल्यवान आभूषणे, पुनउ&पयोगी ऊर्जानिर्मिती आणि वाहनांचे सुटे भाग आदी वस्तूंच्या व्यापाराच्या संदर्भात हा करार दोन्ही देशांसाठी लाभदायक ठरु शकतो, असे उद्योगक्षेत्रातील मान्यवरांचे म्हणणे आहे. पियुष गोयल हे सध्या ओमानमध्येच आहेत. त्यांनी बुधवारी भारत-ओमान आर्थिक फोरमसमोर भाषण केले. त्यात त्यांनी हा द्विपक्षीय लाभाचा करार होणार असल्याची घोषणा केली आहे.
2023 पासून चर्चा
भारत आणि ओमान यांच्यात 2023 पासून मुक्त व्यापार करार करण्यासंदर्भात चर्चा होत आहे. दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण चर्चेनंतर या करारासंबंधी दोन्ही देशांमध्ये संमती झाल्यानंतर आता त्यावर स्वाक्षऱ्या होणार आहेत. ओमानच्या माध्यमातून भारताला गल्फ सहकार्य परिषदेतील देश, पूर्व युरोपियन देश, मध्य आशियातील देश आणि आफ्रिकेतील देश यांची बाजारपेठ मोकळी होणार आहे. भारताने नव्या बाजारपेठा शोधण्यासाठी अभियान हाती घेतले आहे, असे गोयल यांनी स्पष्ट केले.
चार महत्वाची क्षेत्रे
भारत आणि ओमान यांच्यात सहकार्यासाठी चार महत्वाची क्षेत्रे आहेत. पारंपरिक ऊर्जा, पुनउ&पयोगी ऊर्जा, हरित हैड्रोजन, बॅटरी स्टोरेज आदी क्षेत्रांमध्ये दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करु शकतात. त्या खेरीज पायाभूत सुविधा विकास, बहुविध सामग्री पुरवठा आणि निर्यात वेअरहाऊसेस आदींच्या निर्मितीतही दोन्ही देश एकमेकांना साहाय्यभूत ठरु शकतात. अन्न सुरक्षा हे क्षेत्रही महत्वाचे आहे. ओमानच्या अन्न सुरक्षा प्रयत्नांमध्ये आम्ही त्यांना साहाय्य करु शकतो. तसेच स्टार्टअप इकोसिस्टिम निर्माण करण्याच्या क्षेत्रात आम्ही एकमेकांना उपयोगी ठरु शकतो. या सर्व शक्यता येत्या काळात प्रत्यक्षात उतरतील. दोन्ही देशांमधील संबंध अधिक बळकट होतील, अशी अपेक्षा पियुष गोयल यांनी व्यक्त केली.
Comments are closed.