लवकरच भारत आणि यूएस दरम्यान मुक्त व्यापार करार
माजी विदेश सचिवांचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के आयातशुल्क लादले आहे. हे आयातशुल्क बुधवारपासून लागू झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिकेदरम्यान मुक्त व्यापार कराराची शक्यता नसल्याचे मानले जातेय. परंतु याचदरम्यान माजी विदेशसचिव आणि राज्यसभा खासदार हर्षवर्धन श्रृंगला यांनी चकित करणारे विधान केले. दोन्ही देश मुक्त व्यापार करारावरून लवकरच मार्ग काढतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेत भारताकडून निर्यात होणाऱ्या सामग्रीवर 50 टक्के आयातशुल्क आकारण्यात येईल. हा प्रभाव कमी करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. आता पर्यायी बाजारपेठांचा शोधही घेतला जाईल. आमचा ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिरात, ब्रिटनसोबत मुक्त व्यापार करार झाला आहे. युरोपीय महासंघासोबत मुक्त व्यापार करार करण्याच्या समीप आहोत. आम्ही अनेक बाजारपेठांपर्यंत पोहोचू शकतो, असे वक्तव्य श्रृंगला यांनी केले.
अमेरिकेसोबत आमचे सर्वात व्यापक आणि बहुआयामी संबंध आहेत. हे संबंध अन्य कुठल्याही देशाच्या तुलनेत महत्त्वपूर्ण आहेत. आम्ही लवकरच अमेरिकेसोबत एक समाधानकारक मुक्त व्यापार करारासाठी मार्ग शोधू आणि हा निश्चितपणे आम्हाला अध्यक्ष ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्या पुढील टप्प्यापर्यंत नेईल, अशी अपेक्षा असल्याचे श्रृंगला म्हणाले.
काही क्षेत्रांना होणार नुकसान
ट्रम्प यांच्या नव्या आयातशुल्क व्यवस्थेमुळे भारताची काही उद्योगक्षेत्रे प्रभावित होण्याची शक्यता आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या (जीटीआरआय) एका अहवालानुसार आयातशुल्क लागू झाल्यावर भारताच्या श्रमप्रधान उद्योगक्षेत्रांच्या निर्यातीत 70 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.