कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न?, अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी FIR नोंदवण्यास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा नकार
दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी आता एक नवा पेच निर्माण झाला असून, या प्रकरणातील एफआयआर (FIR) दाखल करण्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात गंभीर आरोप केले असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने डीजीसीएच्या (DGCA) अहवालावर आधारित एफआयआर दाखल करण्यास नकार दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे विमान अपघाताबाबतचा संशय आता अधिकच गडद झाला असल्याचे रोहित पवार म्हणाले आहेत. X वर एक पोस्ट करत ते असे म्हणाले आहेत.
अजित पवार यांच्या विमान अपघाताला व्हीएसआर (VSR) कंपनीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा स्पष्ट अहवाल डीजीसीएने दिला आहे. या अहवालाच्या आधारे आमदार रोहित पवार, आमदार अमोल मिटकरी, आमदार इद्रिस नाईकवडी आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. बीएनएस (BNS) कायद्यानुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती. सुरुवातीला पोलिसांकडून जबाब घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, मात्र ऐनवेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हा एफआयआर दाखल करून घेण्यास नकार दिला. पोलिसांनी केवळ औपचारिकता म्हणून अर्ज स्वीकारल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
या सर्व प्रकारावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूंच्या लोकप्रतिनिधींनी मागणी करूनही जर पोलीस एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ करत असतील, तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. पोलीस आणि सरकार या माध्यमातून कुणाला तरी वाचवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. “वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या नकारामुळे आमचा संशय अधिकच बळावला असून, यातून अजितदादांना खरोखर न्याय मिळेल का?” अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत योग्य कारवाईची वाट बघत असतानाच काल या अपघातास VSR कंपनीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा DGCA चा अहवाल आला. परंतु अद्यापही याबाबत कोणताही FIR दाखल करण्यात आला नसल्याने या अहवालाच्या आधारे आ. अमोल मिटकरी, आ. इद्रिस नाईकवडी आणि आ. संदिप क्षीरसागर… pic.twitter.com/T1W5sJS9ji
– रोहित पवार (@RRPSpeaks) 25 फेब्रुवारी 2026
Comments are closed.