Friends’ lives were cut short when a tree fell on their running bike
वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु असताना महिंद्रा कंपनीत कामाला जाणाऱ्या कामगार असलेल्या दोन मित्रांच्या धावत्या दुचाकीवर झाड पडले. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.१२) दुपारी ३.१३ वाजता सातपूर औद्योगिक वसाहतीतील टपारीया कंपनीजवळ घडली. गौरव भास्कर रिपोटे (वय २१, दोघेही रा. रमाबाई आंबेडकरनगर, रेल्वे मालधक्का रोड, गुलाबवाडी, नाशिकरोड, नाशिक), सम्यक नीलेश भोसले (१९) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. (Friends’ lives were cut short when a tree fell on their running bike)
पोलिसांच्या माहितीनुसार, गौरव व सम्यक हे दोघेही मित्र आहेत. दोघेही महिंद्रा कंपनीत कामाला होते. दोघे सातपूरमध्ये भाड्याने रूममध्ये राहत होते. महिंद्रा कंपनीत दोघे एकाच वेळी कामाला जात होते. सोमवारी नेहमीप्रमाणे दुपारी ३ वाजेदरम्यान दोघे ॲक्टिव्हावरून महिंद्रा कंपनीत जाण्यासाठी निघाले. गौरव ॲक्टिव्हा चालवत होता. दोघे सातपूर औद्योगिक वसाहतीतील टपारीया कंपनीजवळ आले. त्यावेळी अचानक मोठे झाड दुचाकीवर पडले. गौरवच्या अंगावर झाड पडल्याने त्याच्या चेहऱ्यास व डोक्यास गंभीर दुखापत होऊन तो बेशुध्द झाला. त्यास तात्काळ उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले. या दुर्घटनेत सम्यक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी दोघांच्या मित्रांनी मदतीसाठी धाव घेतली होती.
गौरव अन् सम्यकच्या मित्रांना आश्रू अनावर
गौरव रिपोटे व सम्यक भोसले हे दोघेही जीवलग मित्र होते. दोघांचाही मित्र परिवारही मोठा आहे. दोघे जखमी झाल्याचे समजताच त्यांच्या मित्रांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी गौरवला मृत घोषित केल्याचे समजताच त्याच्या मित्रांना धक्का बसला. सम्यक हासुद्धा गंभीर जखमी असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. दोघांचाही अपघाती मृत्यू झाल्याने मित्रांना आश्रू अनावर झाले.
चार महिन्यांपूर्वीच मिळाली होती नोकरी
गौरव रिपोटे हा बारावी पास झाला होता. त्याच्या पश्चात आई, वडील व दोन बहिणी आहेत. त्याला ५ डिसेंबर २०२४ रोजी महिंद्रा कंपनीत ट्रेनी म्हणून नोकरी मिळाली होती. त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी हालाकीची असल्याचे मित्रांनी सांगितले.
Comments are closed.