एक गौतम तसा अन् एक असा!

>> संजय कऱ्हाडे

एक गौतम बुद्ध होता. एक गौतम निर्बुद्ध आहे! त्या गौतमाने जगाला ममतेचा, नैतिकतेचा अन् शहाणपणाचा कित्ता दिला. या गौतमाने तो कित्ता खलात घालून बत्त्याने ठेचून टाकला! गौतम गंभीर अहंकाराला मिठी मारून बसलाय! फिरकी गोलंदाजी आपल्या आजच्या फलंदाजांना खेळता येत नाही हे न्यूझीलंडविरुद्ध वर्षभरापूर्वीच आपल्याला पक्कं कळलं, पण गंभीरला वळलेलं दिसत नाही. मनगटावर घडय़ाळ बांधून मैदानावर उतरलेली पिढी कसोटी क्रिकेटची अथांगता जपेल तरी कशी! ‘कुओं और तालाबों में डुबकीयां लगाने वाले समंदर में तैर नहीं सकते’चा अर्थ गौतमला समजवावा तरी कसा!

मात्र नेमकं हेच करण्याचा प्रयत्न गौतम गंभीर करतोय! वॉशिंग्टनला तिसऱ्या क्रमांकावर खेळवून साईच्या डोक्यात भुसा भरतोय. एका ऑफस्पिनरचा बळी देतोय. यशस्वीचा आत्मविश्वास तोडून त्याला अयशस्वी करतोय. शुभमनला यांत्रिकी मानव बनवू पाहतोय. राहुलला मनमानी वागणूक देऊन अपमानित करतोय. करुण-सरफराजला कसोटीच्या वेशीवरच डांबून ठेवतोय. एक ना अनेक! गौतमच्या राज्यात खेळाडू साशंक झालेत, घाबरून खेळतायत असं तर कैफसुद्धा म्हणालाय!

आपल्याकडे बुमरा-सिराजसारखे गुणी जलदगती गोलंदाज आहेत, त्याचप्रमाणे जडेजा-वॉशिंटनसारखे अष्टपैलू आहेत आणि कुलदीपसारखा दर्जेदार फिरकी गोलंदाज आहे. एवढय़ा पुंजीवर चांगल्या खेळपट्टीवर सामने जिंकण्याची कुवत आपल्याकडे आहे. त्यासाठी आवश्यकता आहे खेळाडूंना आत्मविश्वास देण्याची, त्यांच्या पाठीवर धपाटा नाही थाप मारण्याची. पराभूत झाल्यावर ‘मानसिकदृष्टय़ा फलंदाज तयार नाहीत’ म्हणत दोष देण्यापेक्षा मी त्यांना तयार करू शकलो नाही, अशी कबुली देण्याची! अन् अनुभवी खेळाडूंना मानसिकदृष्टय़ा खंबीर करण्यासाठीच तर गंभीरची नेमणूक झालीये!

तरीही गुवाहाटीला दुसऱया कसोटीसाठी पुन्हा एकदा तशीच खेळपट्टी तयार केली जाईल आणि संघात शुभमन नसेल तर साईचा समावेश होईल. कुलदीपला डच्चू मिळून नितीश कुमार खेळेल असं मला वाटतंय. जिद्दी अन् अहंकारी माणसाची ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी वृत्ती असते. विजय मिळवून मालिका बरोबरीत सुटली की ब्रह्मपुत्रेत न्हायला मोकळं!

यजमान संघाने हवी तशी खेळपट्टी बनवावी, मात्र प्रथम फलंदाजी कुणी करायची हे अतिथी संघाने ठरवावं, अशी एक अतिशय स्तुत्य सूचना काही वर्षांपूर्वी करण्यात आली होती. यजमान संघाला सोयिस्कर ठरेल अशी खेळपट्टी बनवण्याचा हट्टच यामुळे बाद ठरेल. अर्थात, पाटा खेळपट्टय़ा बनवण्याचा मोह होईल हेही खरं. पण निग्रहाने मोठी खेळी करण्याचा, फलंदाज बाद करण्याचा अधिक जोरदार प्रयत्नसुद्धा होईल. कसब, कौशल्य, संयम अन् निग्रह पणाला लागेल! किमान, त्रयस्थ पंच आल्यानंतर जशी आरोपांची फैर बंद झाली तशी खेळपट्टी बनवण्याच्या अनुषंगाने होणारी टीकेची फैर झडणं तरी बंद होईल! असो, एक गौतम तसा अन् एक असा!

Comments are closed.