मोदींच्या सल्ल्याची देश लुटतोय मजा! कुणी घोड्यावर, कुणी बैलगाडीत तर, कुणी सायकलवर… दिवसभर फुल टू धमाल!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आखाती युद्धामुळे इंधनाची बचत करा, वर्षभर सोने खरेदी करू नका, वाहनाचा वापर कमी करा, परदेश प्रवास करू नका, वर्क फ्रॉम होम करा… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या अजब सल्ल्यांची अख्खा देश मजा लुटत आहे. कुणी घोड्यावरून प्रवास करतोय, तर कुणी बैलगाडीने. इंधन बचतीसाठी सायकलीही रस्त्यावर उतरल्या असून ग्रामीण भागातील लोकांनी रस्त्यावर चुली मांडल्या. तर काहींनी मोदींचा ‘सल्ला’ शिरसावंद्य मानून कित्येक किलोमीटर पायपीट केल्याचे प्रकार आज समोर आले. देशभरात दिवसभर ‘फुल टू धमाल’ सुरू होती. मोदींच्या सल्ल्यांमुळे आर्थिक स्थिती डबघाईला येण्याच्या भीतीने शेअर बाजाराची गटांगळी उडाली. कच्च्या तेलालाही दरवाढीची ‘उकळी’ आली असून चांदीच्या दरात दहा हजारांची वाढ झाली, तर सोने 1 लाख 56 हजारांवर स्थिर राहिले.

गाड्या बंद ठेवतो, ‘ईएमआय’ तुम्ही भरा!

मोदीजी, आम्ही गाड्या वापरणे बंदच करतो, फक्त तुम्ही ‘ईएमआय’ भरा, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या. ‘सकाळी पेट्रोल वाचवा’ आणि संध्याकाळी शेकडो गाड्यांचा रोड शो काढा’ असा टोला काहींनी लगावला. इंधन बचतीची जबाबदारी फक्त जनतेचीच आहे की सरकारची आहे, असा सवालही उपस्थित करण्यात आला. मध्य प्रदेशमध्ये हायकोर्टाचे न्यायाधीश थेट सायकलवरूनच न्यायालयात पोहोचले.

सासुरवाडीच्या उत्साहाला उधाण

मोदींच्या सल्ल्याने या वर्षी अधिक मासात (धोंड्याचा महिना) जावईबापूंना मानसन्मानात सोने न देण्यासाठी चांगलेच कारण सापडले आहे. सोन्याच्या गगनाला भिडलेल्या दरांमुळे टेन्शन वाढलेल्या सासू-सासऱयांना मोठा दिलासा मिळणार आहे. जावईबापूंना केवळ नारळ देऊन मान राखता येणार आहे. त्यामुळे सासुरवाडीच्या उत्साहाला उधाण आले असून माहेरचे पैसे वाचणार असल्याने लाडकी लेकही खुशीत आहे.

Comments are closed.