पॉवरलिफ्टर राजेंद्र चव्हाण यांचा सत्कार

पहाटे घराघरांत वर्तमानपत्र पोहोचवणारे, दिवसभर नोकराच्या निमित्ताने समाजाशी नाळ जोडणारे आणि विविध खेळांच्या माध्यमातून मैदानावर पराक्रम गाजवणारे असा भन्नाट प्रवास करणाऱया राजेंद्र चव्हाण यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. निमित्त होतं केरळच्या कोझिकोडे येथे झालेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग मास्टर चॅम्पियनशिपमध्ये तिसरा क्रमांक पटकावण्याचं.
लहानपणापासूनच वृत्तपत्र वितरणाची जबाबदारी खांद्यावर घेतलेले राजेंद्र चव्हाण ऊन, पाऊस, वारा काहीही असो लोकांना वेळेत वर्तमानपत्र मिळावं यासाठी धडपडत राहिले. गेली 30 वर्षे पोस्ट विभागात नोकरी करताना ते आपली समाजसेवेची भूकही भागवत होते. त्याचबरोबर कबड्डीची ओढ जिवंत ठेवताना त्यांनी राष्ट्रीय कबड्डीपटू म्हणून शानदार कामगिरी केली. पुढे प्रशिक्षक म्हणून त्यांनी असंख्य तरुणांना घडवले. कबड्डीनंतर पॉवरलिफ्टिंगकडे वळून त्यांनी आपली ताकदही दाखवली आणि या खेळात पदके जिंकण्याची किमयाही दाखवली.
या विजयी कामगिरीबद्दल त्यांचा विधान परिषद आमदार सुनील शिंदे, बृहन्मुंबई वृत्तपत्र विव्रेता संघाचे विश्वस्त जीवन भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी लोअर परळ वृत्तपत्र विव्रेता संघाचे सचिव रिंगे, प्रकाश चव्हाण, सत्यवान धुमाळे, धनाजी बुगडे, सुभाष बावडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी चव्हाण यांचा गौरव करताना कुटुंबाचा वृत्तपत्र व्यवसाय, शासकीय नोकरी आणि क्रीडा क्षेत्र या तिन्ही आघाडय़ांवर चव्हाण यांनी गाजवलेले यश प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याचे उद्गार काढले.
Comments are closed.