साई सुदर्शन ठरणार विराटचा वारसदार!

शारीरिकदृष्टय़ा सशक्त नसल्याचे कारण देत साई सुदर्शनला 2019 मध्ये तामीळनाडूच्या 19 वर्षांखालील संघातून डच्चू देण्यात आला होता. मग 2020 मध्ये कोरोना नावाच्या महामारीने अवघं जग ठप्प झालेलं होतं. या काळात साईचं संपूर्ण कुटुंब घरातच होतं. याच काळात कुटुंबीयांनी त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं. साईला विराट कोहलीचे फिटनेस व्हिडीओ दाखविण्यात आले. या व्हिडीओतून प्रेरणा घेत आणि फिटनेसच्या कौटुंबिक उपक्रमातून एक सशक्त साई सुदर्शन घडला. त्याने जीव ओतून नेटचा सराव केला. काऊंटी क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध केलं. प्रथम श्रेणी क्रिकेटमधून त्याची फलंदाजीतील गुणवत्ता अधोरेखित झाली. मग आयपीएलच्या 18व्या हंगामात सर्वाधिक धावा करून तो ‘ऑरेंज कॅप’चा मानकरी ठरला. आता बहुचर्चित इंग्लंड दौऱयावरील कसोटी मालिकेसाठी त्याची निवड झाली. या खडतर दौऱयावर गेलेल्या साई सुदर्शनकडे आता विराट कोहलीचा वारसदार म्हणून बघितले जात आहे.

‘माझा मुलगा हिंदुस्थानसाठी कसोटी खेळणार… खरं सांगू का, हे बोलतानाही माझे डोळे पाणावतात,’ असे भावुक शब्द आहेत साई सुदर्शनच्या आई उषा भारद्वाज यांचे. इंग्लंड दौऱयासाठी हिंदुस्थानच्या कसोटी संघात निवड झाल्याच्या बातमीनंतर सुदर्शनच्या कुटुंबाने व्हिडीओ कॉलवर एकत्र येत हा संस्मरणीय क्षण साजरा केला. आई-वडील चेन्नईत, मोठा भाऊ ऑस्ट्रेलियात आणि साई अहमदाबादमध्ये. मात्र, सुदर्शनच्या निवडीने व्हिडीओ कॉलवर हे कुटुंब एकत्र आलं अन् त्यांना पुन्हा 2020 मधल्या आठवणीत घेऊन गेलं. त्यावेळी संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन साईच्या तयारीसाठी काम करत होतं. साई सुदर्शनची आई जी स्वतः तामीळनाडूसाठी व्हॉलीबॉल खेळलेली आहे व सध्या स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच आहे, त्या आईने साईच्या फिटनेसवर लक्ष दिलं. वडील भारद्वाज, ज्यांनी 1993च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत धावपटू म्हणून देशाचे प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांनी साईच्या रनिंग ट्रेनिंगकडे लक्ष दिलं. मोठा भाऊ बी. साईराम हादेखील नेट्समध्ये त्याच्यासोबत बॉलिंग करत असे. विराट कोहलीच्या फिटनेस व्हिडीओतून प्रेरणा घेत साईची क्रिकेटमधील मजल- दरमजल सुरू झाली. चेन्नईच्या खेळपट्टीवर तो फिरकी गोलंदाजीला सामोरा गेला.

नेट्समधील सरावाने घडवला कसोटीपटू

साई सुदर्शनचा तामीळनाडू संघातील सहकारी आणि गुजरात टायटन्समधील त्याचा संघसाथी आर. साई किशोर यानेही साई सुदर्शनची स्तुती केली. तो म्हणाला, ‘साई म्हणजे सरावासाठी झपाटलेला खेळाडू. एकेकाळी त्याला नेट्समधून बाहेर खेचावं लागायचं. 2021 ते 2022, मग 2023 मध्ये त्याच्या फलंदाजीतील झपाटय़ाने झालेली प्रगती आम्हा सीनियर्सनाही शिकण्यासारखी आहे. साईला कोणत्याही व्यासपीठाचा दबाव वाटत नाही. तो नेहमी आत्मविश्वासाने खेळतो. त्याच्या तंत्रात जितकी सफाई आहे, तितकीच त्याची मानसिक ताकदही मोठी आहे.’

मला अजून भरपूर शिकायचंय!

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्सकडून खेळताना साई सुदर्शनने 15 डावांमध्ये 156.17च्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक 759 धावांची लयलूट केली. कुठल्याही फलंदाजासाठी ही अभिमानास्पद कामगिरी होय. मात्र, साईसाठी ती केवळ पुढील टप्प्याची पायरी आहे. ‘मला क्रिकेटमध्ये अजून खूप काही शिकायचं आहे,’ अशी प्रांजळ कबुलीही त्याने दिली आहे.

अॅलेक्सने हेरली गुणवत्ता

साई सुदर्शनने इंग्लंडमध्ये सरे संघाकडून 2023 आणि 2024 मध्ये काही सामने खेळले. सरेचे माजी संचालक आणि इंग्लंडचे माजी यष्टिरक्षक ऍलेक स्टीवर्ट यांनी साई सुदर्शनच्या फलंदाजीची गुणवत्ता हेरली. साई चेंडू डोळ्याच्या खाली खेळतो, वेळ साधतो. त्याची सौम्य फलंदाजी आणि शॉट्सची रेंज इंग्लंडमध्ये त्याला यशस्वी करेल,’ असं स्टीवर्ट सांगतात.

कोहलीनंतर साईचा काळ!

आईने दाखवलेल्या विराट कोहलीच्या व्हिडीओपासून प्रवास सुरू झालेला साई सुदर्शन आता कोहलीनंतरच्या युगात ‘टीम इंडिया’च्या टॉप-4 मधील फलंदाज होय. कोहलीचं स्थान कुणीही घेऊ शकत नाही. मात्र, साईने ‘मी विराट आहे’ असं न समजता ‘मी माझं सर्वोत्तम देणार’ असा विचार केला तर कोहलीनंतर नक्कीच आता साई सुदर्शनचा काळ असणार आहे.

Comments are closed.