यश दयाल अडचणीत? गंभीर आरोपांमुळे 10 वर्षांची जेल व IPLमधून बॅन होण्याची शक्यता
आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) चॅम्पियन बनवण्यात महत्वाची भूमिका बजावणारा वेगवान गोलंदाज यश दयाल (Yash Dayal) सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
खूप दिवसांपासून सोशल मीडियावर एक महिला त्यांच्यावर गंभीर आरोप करत होती. आता त्या महिलेनं इंदिरापूरम पोलीस ठाण्यात एफआयआर देखील नोंदवली आहे. त्यामुळे यश दयालवर आयपीएल मधूनही बंदी येण्याची शक्यता आहे. एवढंच नाही, तर आरोप सिद्ध झाल्यास त्याला 10 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.
यश दयालविरोधातील हे प्रकरण आता खूप मोठं झालं आहे. या प्रकरणात पीडित महिलेनं व्हॉट्सअॅप चॅट, व्हिडिओ कॉल आणि फोटोचे स्क्रीनशॉट अशा अनेक पुराव्यांसह एफआयआर दाखल केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
भारतीय दंड संहितेच्या कलम 69 अंतर्गत ही एफआयआर नोंदवली गेली आहे. एक अजामीनपात्र कलम आहे आणि यात आरोप सिद्ध झाल्यास 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे पोलिसांच्या तपासात यश दयाल याच्यावरचे आरोप सिद्ध झाले, तर त्याला अटकही होऊ शकते.
बीसीसीआय (BCCI) च्या नियमानुसार, आयपीएल (IPL) चालू असताना घडलेल्या घटनेवर बोर्ड कारवाई करू शकतो. कारण त्या काळात खेळाडू बोर्डाच्या आचारसंहितेला बांधील असतात. स्पर्धा संपल्यानंतर मात्र खेळाडूवर तात्काळ मोठा निर्णय घेण्याचा नियम नाही. तरीसुद्धा, तपास चालू असताना बोर्ड आणि फ्रँचायझी यश दयालला निलंबित करू शकतात. त्यामुळे तो संघाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाही. न्यायालयात आरोप सिद्ध झाल्यानंतर मात्र बीसीसीआय त्याच्यावर बंदी आणू शकते.
Comments are closed.