FSSAI ने चहाची व्याख्या बदलली आहे.
आता हर्बल, फ्लॉवर टी ला ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘एफएसएसएआय’ने चहाची व्याख्या निश्चित केली आहे. सरकारच्या निर्देशानुसार फक्त कॅमेलिया सायनेन्सिस वनस्पतीपासून बनवलेल्या पानांना चहा मानले जाईल. हर्बल किंवा फ्लॉवर टीपासून बनवलेल्या चहाला चुकीचे ब्रँडिंग मानले जाईल. उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, ग्राहकांना अचूक माहिती मिळेल याची खात्री करून आणि कंपन्यांना स्पष्ट लेबलिंग लागू करण्यास प्रवृत्त केले जाईल, असे ‘एफएसएसएआय’ने म्हटले आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (‘एफएसएसएआय’) चहासंबंधी महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार फक्त कॅमेलिया सायनेन्सिस वनस्पतीपासून बनवलेल्या उत्पादनांना ‘चहा’ म्हटले जाऊ शकते. शिवाय, इतर वनस्पती, औषधी वनस्पती किंवा फुलांपासून बनवलेल्या पेयांना ‘चहा’ म्हणणे चुकीचे, दिशाभूल करणारे आणि कायदेशीररित्या अयोग्य मानले जाणार आहे. तसेच निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006 अंतर्गत कारवाई केली जाईल. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना परिस्थितीवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हर्बल टी, रुईबोस टी आणि फ्लॉवर टी सारखी अनेक उत्पादने बाजारात ‘चहा’ या लेबलखाली विकली जात असल्याबद्दल ‘एफएसएसएआय’ने चिंता व्यक्त केली आहे. यासंबंधी प्राधिकरणाने कोणत्याही अन्न पॅकेजचे योग्य आणि मूळ नाव पॅकेजिंगच्या समोर लिहिले पाहिजे, असे म्हटले आहे. तसेच कॅमेलिया सायनेन्सिसपासून बनवलेल्या नसलेल्या उत्पादनांवर ‘चहा’ हा शब्द वापरणे चुकीचे ब्रँडिंग मानले जाईल. अशी पेये ‘नॉन-स्पेसिफाइड फूड’ (2017) अंतर्गत येतील, असे स्पष्ट पेले आहे. यासंबंधी ‘एफएसएसएआय’ने उत्पादक, विक्रेते, आयातदार आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मना सतर्क केले आहे.
Comments are closed.