नायरा एनर्जीकडून इंधन दरवाढ

पेट्रोल 5 रुपये तर डिझेल 3 रुपयांनी महाग

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर नायरा एनर्जीने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 5 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांनी वाढ केली आहे. नव्या दरवाढीमुळे आता भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव 111.72 रुपये आणि डिझेलचा भाव 94.88 रुपयांवर पोहोचला आहे. नायरा एनर्जीने केलेली ही दरवाढ स्थानिक कर आणि व्हॅटनुसार राज्यानुसार बदलू शकते. काही राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 5.30 पर्यंत वाढ झाली आहे. देशभरात नायरा एनर्जीचे अंदाजे 7,000 पेट्रोलपंप आहेत. तथापि, आयओसीएल, एचपी आणि बीपी यांसारख्या सरकारी तेल कंपन्यांनी भाववाढ केलेली नाही.

सरकारी कंपन्यांनी नियमित पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली नसली तरी गेल्या आठवड्यात प्रीमियम पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ झाली. याव्यतिरिक्त कारखाने आणि मोठ्या ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या औद्योगिक वापरासाठीच्या ‘बल्क डिझेल’च्या दरात प्रतिलिटर 22 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या दाव्यानुसार भारतीय तेल कंपन्यांकडे कच्च्या तेलाचा पुरेसा साठा आहे. देशातील कोणत्याही पंपावर पेट्रोल आणि डिझेलची कमतरता नसल्यामुळे भाववाढ होणार नसल्याचे सांगितले जात आहे. तथापि, सध्या कच्च्या तेलाने 100 डॉलर प्रतिबॅरलचा टप्पा ओलांडला आहे. युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाची किंमत 70 डॉलरवरून 100 डॉलर प्रतिबॅरलच्या वर गेल्यामुळे पेट्रोल-डिझेलची दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Comments are closed.