इंधनाची स्थिती समाधानकारक आहे.
सर्वपक्षीय बैठकीत केंद्र सरकारकडून माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतात कोणत्याही प्रकारच्या इंधनाची टंचाई नसून परिस्थिती समाधानकारक आहे. भारताने इंधन पुरवठ्यासाठी विविध पर्यायांचा शोध घेतला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून अनेक इंधनवाहक नौका सुखरुप भारतात आल्या असून आणखी नौका येण्यासाठी सज्ज आहेत. त्यांना कोणताही अडथळा होणार नाही, हे सुनिश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली.
मध्यपूर्वेतील युद्ध परिस्थिती आणि भारतातील इंधन परिस्थिती, यांच्यासंबंधी विरोधी पक्षांना माहिती देण्यासाठी बुधवारी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला बहुतेक सर्व विरोधी पक्षांचे महत्वाचे नेते उपस्थित होते. उपस्थितांना सध्याच्या स्थितीची माहिती देण्यात आली. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले. त्यांना केंद्र सरकारच्या वतीने समर्पक उत्तरे देण्यात आली. या परिस्थितीत आम्ही केंद्र सरकारसमवेत आहोत, असे विरोधी पक्षांनी स्पष्ट केले, अशी माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. संसदेच्या केंद्रीय सभागृहात ही बैठक जवळपास दोन तास चालली होती.
होर्मुझ सामुद्रधुनीची स्थिती
होर्मुझची सामुद्रधुनी हा सध्या जागतिक चर्चेचा विषय आहे. बैठकीतही या विषयावर सविस्तर चर्चा झाली. या सामुद्रधुनीतून इंधन नौकांचा प्रवास आव्हानात्मक असला, तरी भारताने संबंधित देशांशी आणि इराणशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. त्यामुळे आतापर्यंत भारताच्या अनेक नौका सुखरुप आल्या आहेत. आणखी नौका आगामी काही दिवसांमध्ये येत आहेत. अनेक देशांच्या नौका या सामुद्रधुनीत अद्यापही अडकून पडल्या असताना, भारताच्या प्रत्येक नौकेला अनुमती मिळाली आहे. हे भारताच्या राजकौशल्याचे यश आहे. या युद्धाशी संबंधित असणाऱ्या सर्व देशांशी भारताचे सौहार्दाचे संबंध आहेत. त्यामुळे भारताला आवश्यक ते सर्व सहकार्य मिळत आहे, असे केंद्र सरकारने बैठकीत स्पष्ट केले.
पाकिस्तानवरही चर्चा
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धात पाकिस्तान मध्यस्थी करणार, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या वृत्तासंबंधीही बैठकीत चर्चा करण्यात आली. या वृत्तात धक्कादायक असे काही नाही. कारण अमेरिकेने 1980 पासून पाकिस्तानचा उपयोग इराणशी संपर्क साधण्यासाठी केला आहे. त्यामुळे या वृत्तात नवे काही नाही. तसेच, हे वृत्त अद्यात अनधिकृत आहे. कारण, अमेरिकेने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाशी आणि या धोरणाच्या यशाशी या घडामोडींचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करु नये, असे केंद्र सरकारने विशद केले.
विक्रम मिस्री यांचे सादरीकरण
या बैठकीत परराष्ट्र विभागाचे सचिव विक्रम मिस्री यांनी परिस्थितीचे सादरीकरण केले. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि तिचे भारतावरील सध्याचे आणि भविष्यकालीन परिणाम, या मुद्द्यावर त्यांनी प्रकाश टाकला. सांसदीय व्यवहार मंत्री किरण रिजीजू यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. या परिस्थितीत देशाची एकजूट दिसली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. केंद्र सरकार परिस्थिती कौशल्याने हाताळत आहे. भविष्यकाळाचा वेध घेऊन धोरणे निर्धारित केली जात आहेत. इंधनपुरवठा अखंड रहावा, यासाठी विविध पर्यायी इंधन स्रोतांचा शोध घेण्यात आला आहे आणि पुढेही ही प्रक्रिया अशीच चालू ठेवली जाईल. सर्वांना विश्वासात घेऊन केंद्र सरकार वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
Comments are closed.