मोखाड्यात धो धो पावसात ताडपत्रीखाली मृतदेहावर अंत्यसंस्कार; लाडक्या बहिणीची मृत्यूनंतरही अवहेलना

गावातील स्मशानभूमीमध्ये शेड नसल्यामुळे निधन झालेल्या लाडक्या बहिणीच्या मृतदेहावर ग्रामस्थांना आणि तिच्या नातेवाईकांना ताडपत्रीचा निवारा उभारून अंत्यसंस्कार करावे लागले आहेत. हा प्रकार मोखाडा तालुक्यातील कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळपाडा येथे घडला. शासनाच्या उदासीनतेमुळे स्मशानभूमीसाठी शेड उभे राहिल्याने नसल्याने पावसाळ्यात पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कुलोंद ग्रामपंचायत हद्दीत कुर्लोद, गावठाण, माणिपाडा, रायपाडा, आंबेपाडा, जांभूळपाडा, पेठेपाडा, शेड्याचा पाडा आणि कापसीपाडा असे 9 गावपाडे आहेत. हे सर्व गावपाडे वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले असून येथील लोकसंख्या तीन हजारांच्या दरम्यान आहे. मात्र या 9 गावपाड्यांत केवळ तीनच स्मशानभूमी आहेत. येथील आदिवासींपर्यंत अजूनही प्राथमिक सुविधा मिळालेल्या नाहीत. जांभूळपाडा येथील यमुना फुफाणे या आदिवासी महिलेचा शुक्रवारी मृत्यू झाला. तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. येथे स्मशानभूमी नसल्याने नातेवाईक व नागरिकांना, यमुना यांच्या पार्थिवावर प्लास्टिक आणि ताडपत्रीचे आच्छादन करून अंत्यसंस्कार करावे लागले आहेत. दरम्यान ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक वेळा वेगवेगळे प्रस्ताव सादर केलेले आहेत. मात्र त्या प्रत्येक ठिकाणी प्रस्ताव रखडलेले आहेत. चालू आर्थिक वर्षात कोणत्याही परिस्थितीत बहुंताश ठिकाणी स्मशानभूमीचे शेड मंजूर करण्याबाबत ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत, अशी प्रतिक्रिया कुलोंद ग्रामपंचायतीचे सरपंच मोहन मोडक यांनी व्यक्त केली आहे.
Comments are closed.