एनसीएमध्ये सुरू झाली भविष्याची तयारी! या 22 युवा वेगवान गोलंदाजांवर आहे बीसीसीआयची नजर
भारतीय संघ सध्या तीनही फॉरमॅटमध्ये बदलांच्या टप्प्यातून जात आहे. अशा परिस्थितीत संघाकडे चांगल्या वेगवान गोलंदाजांचा पूल तयार करणे गरजेचे आहे. विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये सध्या फारसे चांगले वेगवान गोलंदाज उपलब्ध दिसत नाहीत. त्यामुळेच बीसीसीआयने मोठा निर्णय घेत 22 तरुण वेगवान गोलंदाजांना नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये बोलावले आहे. येथे या 22 खेळाडूंना वेगवेगळी प्रशिक्षण देऊन भविष्यासाठी तयार केले जात आहे.
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) भविष्यातील तयारीसाठी एनसीएमध्ये 22 वेगवान गोलंदाजांना बोलावले आहे. यामध्ये 14 उदयोन्मुख वेगवान गोलंदाज आणि 8 अंडर-19 संघातील वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार खलील अहमद, तुषार देशपांडे, विजयकुमार वैशाख, यश ठाकुर, राज बावा, युद्धवीर सिंह आणि अंशुल कंबोज यांची नावे या यादीत आहेत. यांच्याशिवायही काही गोलंदाजांनी या कॅम्पमध्ये भाग घेतला होता.
बीसीसीआयने या कॅम्पची अधिकृत घोषणा करताना सांगितले की, “खेळाडूंनी फिटनेस मूल्यांकनासोबतच बीसीसीआय एक्सलन्स सेंटरमध्ये वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक श्री. ट्रॉय कूली यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य वृद्धी आणि सामरिक कौशल्य विकासावरही काम केले.”
रिपोर्ट्सनुसार बीसीसीआय या खेळाडूंवर येणाऱ्या देशांतर्गत हंगामातही लक्ष ठेवणार आहे, जेणेकरून त्यांना भविष्यात कसोटी संघात संधी देता येईल. टी20 फॉरमॅटसाठी गोलंदाज आयपीएलमधून सहज उपलब्ध होतात, पण कसोटी आणि वनडे फॉरमॅटसाठी बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटलाच मापदंड मानू इच्छित आहे. यामुळेच या खेळाडूंना आत्तापासूनच मोठ्या देशांतर्गत हंगामासाठी तयार केले जात आहे. भारतीय संघ व्यवस्थापन सध्या असे वेगवान गोलंदाज शोधत आहे, जे लांब लांब स्पेल टाकू शकतील.
Comments are closed.