तुर्कीमध्ये चित्रपटाचे शूटिंग करू नका! फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे निर्मात्यांना आवाहन

हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये झालेल्या तणावावेळी पाकिस्तानला दिलेली साथ तुर्कीला चांगलीच भोवणार आहे. कारण तुर्कीमध्ये कोणत्याही चित्रपटाचे शूटिंग करू नये, असे आवाहन फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने (एफडब्ल्यूआयसीई) हिंदुस्थानातील चित्रपट निर्मात्यांना केले आहे.

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकड्यांचे नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानात झालेल्या तणावावेळी तुर्कीने ड्रोनसह क्षेपणास्त्रांचा पुरवठा करत पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिला. त्यामुळे देशभरात ‘बॅन तुर्की’ ही चळवळ उभी राहिली आहे. चित्रपटसृष्टीदेखील तुर्कीवर बहिष्कार टाकला आहे. ‘तुर्कीची भूमिका केवळ राजनैतिक पातळीवरच नव्हे तर विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर आपल्या देशाच्या विरोधात राहिली आहे. देशाच्या सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षेला आव्हान देणाऱ्या तुर्कीत हिंदुस्थानी चित्रपट उद्योगाने गुंतवणूक करू नये’, असे एफडब्ल्यूआयसीईने निवेदनात म्हटले आहे.

तुर्कीच्या सफरचंदावर बहिष्कार टाका

पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला धडा शिकवण्यासाठी पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंदावर बहिष्कार टाकणाऱ्या मार्केटयार्डातील आडत्यांना पाकिस्तानातून धमकी आल्याचा बाजार समितीने निषेध केला आहे. बाजार समितीने आडतदार सुयोग झेंडे आणि कुमार झेंडे यांचा सत्कार करत आडत्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली.

‘बॅन तुर्की’चा ट्रेंड

तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याच्या निषधार्थ तुर्कीच्या सफरचंदावर बहिष्कार टाकण्यात आला. आता व्यापाऱ्यांनी ‘बॅन तुर्की’ असा ट्रेंड सुरू केला आहे. सफरचंदानंतर पुण्यातील मसाले आणि सुकामेवा असोसिएशनने तुर्की येथून आयात होणाऱ्या ड्रायफ्रूट आणि मसाल्यांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments are closed.