संशयाचं भूत डोक्यात शिरलं, दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला, नंतर गावात परतला

गॅचिरोली गुन्हा: गडचिरोलीच्या कोरची तालुक्यातील सोनपूर गावाजवळील जंगल परिसरात एका पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार वाद घालणाऱ्या पतीने अखेर टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. (Gadchiroli Crime News)

या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव टामिनबाई पुरुषोत्तम कचलाम (वय 34) असे असून, आरोपी पतीचे नाव पुरुषोत्तम गजराज कचलाम (वय 34, रा. सोनपूर) आहे. या दाम्पत्याचे सुमारे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना नऊ आणि पाच वर्षांचे दोन लहान मुलं आहेत. आईच्या मृत्यूनंतर या निष्पाप मुलांवर दुःखाचे सावट कोसळले आहे.

हत्या कशी घडली?

पुरुषोत्तम हा स्वभावाने चिडचिडा व संशयी असून, तो पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार शंका घेत असे. त्यामुळे दोघांमध्ये नेहमीच वाद होत असे. 31 ऑगस्ट रोजी दोघांमध्ये जोरदार वाद झाला, त्यानंतर 1 सप्टेंबर रोजी पुरुषोत्तमने पत्नीला माहेरी सोडण्याच्या बहाण्याने पायी घेऊन निघाला. सोनपूर-गोडगुलदरम्यानच्या कामेली जंगल परिसरात पोहोचल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. संतप्त झालेल्या पुरुषोत्तमने पत्नीला जमिनीवर पाडून तिच्या छातीवर बसत गळा दाबून तिचा खून केला.

दारूच्या नशेतच गावकऱ्यांसमोर कबुली

पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी गावात परतला आणि दारूच्या नशेतच गावकऱ्यांसमोर पत्नीला ठार केल्याची कबुली दिली. यानंतर गावकऱ्यांनी याची माहिती मृतकाच्या आई चमरीबाई बोगा (रा. चौकी, जि. मानपूर-मोहला, छत्तीसगड) यांना दिली. त्यांनी 3 सप्टेंबर रोजी कोटगुल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांची कारवाई

तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोरची ग्रामीण रुग्णालयात हलवला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीस सोनपूर येथील एका शेतातून अटक केली. या प्रकरणात आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम 302 (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास सुरू

कोरची पोलिस पुढील तपास करत असून, या घटनेमुळे स्थानिक पातळीवर संतापाचे वातावरण आहे. दारू व घरगुती हिंसाचारामुळे होणाऱ्या अशा घटनांवर प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

इतर महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime Ayush Komkar: वनराज आंदेकरच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, आंदेकर-कोमकर टोळीयुद्धात नातवाचा बळी, गणेश विसर्जनाच्या पुर्वसंध्येला काय काय घडलं?

ड्रग्स फॅक्टरीचा भांडाफोड, 5000 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची हैदराबादमध्ये मोठी कारवाई

आणखी वाचा

Comments are closed.