भामरागडला पुराच्या पाण्याचा वेढा, इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली
छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका दक्षिण गडचिरोलीतील भामरागड तालुक्याला बसला. छत्तीसगडमधील पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली, तर पर्लकोटा नदीच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ झाली. परिणामी भामरागड परिसरात पूरस्थिती निर्माण होऊन अनेक सखल भाग पाण्याखाली गेले. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने 525 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. पुरस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने भामरागडचा संपर्क काही काळ प्रभावित झाला. पुलावरून पाणी वाहत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन्ही बाजूंना पोलीस बंदोबस्त तैनात करून बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. पूरस्थितीत गंभीर रुग्णांच्या उपचारात अडथळा येऊ नये यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) पथकाने दोन गंभीर रुग्णांना बोटीच्या साहाय्याने पर्लकोटा नदी पार करून हेमलकसा येथे सुरक्षितपणे पोहोचविले. तेथून रुग्णवाहिकेने त्यांना पुढील उपचारासाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.
बिनागोंडा आश्रमशाळेतील एका आजारी विद्यार्थिनीची प्रकृती बिघडल्याने तिलाही एसडीआरएफच्या मदतीने गुंडेनूर नाला ओलांडून लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पूरस्थिती निर्माण होताच जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार किशोर बागडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक प्रशासनाने शुक्रवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत बचाव व स्थलांतराची कार्यवाही राबविली.
Comments are closed.