Gadchiroli surrendered naxals gets job opportunity by Gadchiroli Police asj


गडचिरोली : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 11 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली होती. नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले होते. त्यानंतर आता पोलिसांनी या शरणागती पत्करलेल्या 48 नक्षलवाद्यांना लॉयड्स मेटल इंडस्ट्रीमध्ये विविध पदांवर नोकऱ्या दिल्या आहेत. तसेच, यावेळी पोलिस अधीक्षक निलोप्तल यांनी सांगितले की, आतापर्यंत 600 हून अधिक नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. (Gadchiroli surrendered naxals gets job opportunity by Gadchiroli Police)

हेही वाचा : SC on Same Sex Marriage : समलैंगिक विवाहाला मान्यता नाहीच, सुप्रीम कोर्ट निर्णयावर ठाम

– Advertisement –

पोलीस अधीक्षक निलोप्तल यांनी यावेळी सांगितले की, “600 हून अधिक नक्षलवाद्यांनी आतापर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. 2014 मध्ये आत्मसमर्पण धोरणात बदल झाल्यानंतर सरकार अशा नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे.” दरम्यान, या योजनेअंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना सरकारकडून काही पैसे आणि जमीनदेखील देण्यात येते. असे असतानाही गडचिरोली पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकत अशा नक्षलवाद्यांच्या रोजगाराची व्यवस्थादेखील केली आहे. त्यामुळे राज्यभरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही लॉयड्स मेटल्स या कंपनीला आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना नोकऱ्या देण्याचा प्रस्ताव दिला तेव्हा त्यांनी तो स्वीकारला. तसेच, त्यांच्यापैकी 48 जणांना कामावर ठेवले. या नक्षलवाद्यांना त्यांचे शिक्षण आणि कौशल्यानुसार पद देण्यात आले असून त्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आता हे सर्व जण लॉयड्स मेटल्सच्या विविध युनिट्समध्ये काम करत असून त्यांना दरमहा 15 हजार ते 20 हजार रुपये पगार देण्यात येणार आहे.

2019 मध्ये चितगाव परिसरातील डेप्युटी कमांडर असलेले आणि गडचिरोली पोलिसांसमोर शरणागती पत्करलेले मणिराम अटला यांनी सांगितले की, “शरणागती पत्करल्यानंतर मला नवीन आयुष्य जगण्याचा अधिकार मिळाला आहे. लॉयड्स मेटल्समध्ये नोकरी मिळाल्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. मी आता माझे आयुष्य स्वतः जगत असून माझ्यावर कोणतेही दडपण नाही.” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. तसेच, 2014 मध्ये आत्मसमर्पण करणारे प्लाटून कमांडर रमेश काटवो यांनी यावेळी सांगितले की, “10-12 वर्षे नक्षलवादी चळवळीत राहिल्यानंतर मला जाणवले की हा मार्ग चुकीचा असून त्याचा आम्हाला किंवा आमच्या कुटुंबांना फायदा होणार नाही. म्हणून मी 2014 मध्ये आत्मसमर्पण केले होते. सरकारने मला दिलेल्या नवीन नोकरीमुळे मी आनंदी आहे,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.



Source link

Comments are closed.