गलगोटिया विद्यापीठाची हकालपट्टी
चिनी रोबोडॉगच्या प्रदर्शनामुळे एआय परिषदेत वाद
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
येथे आयोजित जागतिक ‘कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदे’तून (एआय समिट) नोयडास्थित गालगोटिया विद्यापीठाची हकालपट्टी करण्यात आली आहे. चिनी बनावटीच्या एका ‘रोबोडॉग’चे प्रदर्शन या विद्यापीठाकडून या परिषदेत करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला. त्यामुळे या विद्यापीठाला या परिषदेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. या विद्यापीठाने या चिनी बनावटीचा रोबोडॉगला स्वत:च्या निर्मितीच्या स्वरुपात सादर केल्याने सोशल मीडियावरून या विद्यापीठावर प्रचंड टीका करण्यात आली. त्यानंतर परिषदेच्या आयोजकांनी हा निर्णय घेतला.
नंतर या विद्यापीठाने या रोबोडॉगसंबंधी स्पष्टीकरणही दिले. या रोबोडॉगची निर्मिती आम्ही स्वत: केली आहे, असे आमचे कधीच म्हणणे नव्हते. आम्ही ही वस्तू चिनी बनावटीची असल्याचे प्रथमपासूनच स्पष्ट केले होते. तसेच, आम्हाला या परिषदेतून बाहेर जाण्याचा आदेश देण्यात आलेला नाही, असेही प्रतिपादन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. तथापि, या आदेशानंतर काही वेळातच विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी त्यांच्या वस्तूंसह परिषद सोडल्याचे दिसून आले आहे.
वाद का झाला निर्माण…
या एआय परिषदेत नोयडा येथील गालगोटिया विद्यापीठानेही भाग घेतला होता. या विद्यापीठाच्या स्टॉलवर एका देखरेख करणाऱ्या यांत्रिक श्वानाचे (सर्व्हेलन्स रोबोटिक डॉग) प्रदर्शन करण्यात येत होते. या श्वानाचे नाव ‘ओरिऑन’ असे असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. या श्वानाची निर्मिती विद्यापीठात भारतीय कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या आधारे करण्यात आली आहे, असे या श्वानाचे वर्णन या विद्यापीठाच्या एक प्राध्यापिका नेहा सिंग या करीत आहेत, असा व्हिडीओ प्रसिद्ध झाल्यानंतर मोठ्या वादाला प्रारंभ झाला. हा यांत्रिक श्वान कोणत्याही परिसराची देखरेख स्वबळावर हालचाली करून करू शकतो, असे त्याचे वर्णन केले जात होते. या प्रकल्पासाठी 350 कोटी रुपये खर्च झाल्याची महितीही दिली गेली.
वस्तुस्थिती काय आहे…
या देखरेख श्वानाची निर्मिती चीनमध्ये यापूर्वीच करण्यात आली असून ही भारताची निर्मिती नाही, ही बाब त्वरितच स्पष्ट झाली आहे. या यांत्रिक श्वानाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादनही चीनमध्ये केले जात असून तो बाजारात साधारणत: 2 लाख 30 हजार रुपयांना उपलब्ध आहे, अशीही माहिती सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. या श्वानाचे नाव ‘युनिट्री’ असे आहे. ही यांत्रिक वस्तू चार पायांवर चालू शकते आणि कोणत्याही परिसराची देखरेख करू शकते. गालगोटिया विद्यापीठाने जेव्हा हा श्वान स्वत:ची निर्मिती म्हणून प्रदर्शित केला, तेव्हा प्रचंड गदारोळ सोशल मीडियावर निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले. त्यानंतर घाईघाईत विद्यापीठाने स्पष्टीकरण प्रसारित केले. हा श्वान विद्यापीठाची निर्मिती असल्याचे आमचे म्हणणे नव्हते. आम्ही तो केवळ एक प्रशिक्षण साधन म्हणून प्रदर्शित केला आहे, असे विद्यापीठाचे म्हणणे आहे. तथापि, विद्यापीठाच्या या प्रतिपादनालाही एका ‘एक्स’ गटाकडून आव्हान देण्यात आले. हा यंत्रश्वान विद्यापीठाने स्वत: बनविला आहे, असे विद्यापीठाकडून प्रथम घोषित करण्यात आले होते, हे या गटाने दाखवून दिल्याने विद्यापीठाची आणखीनच कोंडी झाली आहे.
भारताच्या प्रतिमेला धक्का
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीची जगाला माहिती व्हावी, यासाठी ही जागतिक परिषद आयोजित करण्यात आली आहे. मात्र, चिनी बनावटीची वस्तू भारतीय बनावटीची म्हणून प्रदर्शित करण्याचा उपद्व्याप या विद्यापीठाने केल्याने भारताच्या प्रतिमेला धक्का बसला आहे, अशी टीका सोशल मीडियावरून करण्यात येत आहे. या सर्व प्रकाराची आता गंभीर नोंद घेण्यात आली असून चौकशीचा आदेशही देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
ड गालगोटिया विद्यापीठाच्या कृतीमुळे भारताची प्रतिमा मलीन झाल्याचा आरोप
ड विद्यापीठाने चिनी बनावटीची वस्तू स्वत:ची म्हणून प्रदर्शित केल्याने गदारोळ
ड विद्यापीठावर कठोर कारवाई करण्याची मागणी, या प्रकाराची चौकशी होणार
Comments are closed.